नायलॉन मांजाचे दुष्परिणाम दरवर्षी समोर येत असताना देखील शासन व प्रशासन व नागरीक उदासीन व बेजबाबदार असल्याचे दिसून येत आहे.नॉयलॉन मांजामुळे अनेक पक्षी, पशु व अनेक ठिकाणी मानवी जीवित हानी होत आहे ही बाब लक्षात घेऊन नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही मकरसंक्रात आली की, नायलॉन मांजाची विक्री छुप्या पद्धतीनं होते.यात कित्येक बळी जात असून मानवी जीवित हानी मोठया प्रमाणात होत आहे. याला आळा घालण्यासाठी ठोस पाऊलं उचलण्याची गरज आहे.
अतिशय दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नये याकरिता या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व त्यावरील बंदी हा एकमेव उपाय असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे सध्याच्या काळात अतिशय आवश्यक आहे.
पतंग उडवण्याची हौस लहान मुलांमध्ये वाढली पाहिजे म्हणून पालकच मुलांना पतंगी व मांजा आणून देतात, पालकच जर नायलॉन मांजाची मागणी करीत असतील बिचारी लहान मुले काय करणार? नायलॉनच्या मांजामुळे अनेक ठिकाणी अपघात घडतांना दिसत आहे, विशेषतः टू व्हिलर वरून जातांना अचानक नायलॉनच्या मांजामुळे अनेकांची मान, नाक, चेहरा कापला गेला आहे, त्या मुळे वाद झाले आहेत पण तरीही नायलॉन चा मांजा बंद झाला नाही, पतंगी सहजासहजी कापली जाऊ नये म्हणून अनेकजण नायलॉनच्या मांजाची मागणी करत असतात, पण या कडे गांभीर्याने लक्ष घालून नायलॉन मांजा वर बंदी आणून महाराष्ट्रात,भारतात त्याचे उत्पादन बंद करावे, दुकानदाराकडे जर जुना साठा असल्यास सरकारने त्यांना मोबदला देऊन परत घ्यावा, शाळा कॉलेजमध्ये, विदयार्थ्यांना समुपदेशन करून नायलॉन मांजा वापरू नये म्हणून आवाहन करावे, सामाजिक संस्थांनी पतंग महोत्सव शहरातील विविध मैदानांवर साजरे करून विदयार्थ्यांना साधा मांजा वापरण्यास प्रवृत्त केल्यास नायलॉन मांजा खरेदीवर परिणाम होऊ शकतो.
- -प्रा डॉ सुधीर अग्रवाल