अमरावती : कोविड -19 मुळे उद्भवलेली संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेऊन नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत घरीच राहून अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंध कायद्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात 31 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात पाच जानेवारीपर्यंत रात्री 11 पासून ते सकाळी सहापर्यंत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने उद्या (31 डिसेंबर) रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे मार्गदर्शक सूचनांत नमूद आहे.
नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Related Stories
September 5, 2024
September 5, 2024
September 4, 2024