अमरावती : कोरोनाची साथ असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी निरंतर आपले कर्तव्य बजावले. जिल्ह्यातील दुर्गम भागातील धारणी तालुक्यातील धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्राने गत सहा महिन्यात 126 मातांची सुखरुप प्रसुती करुन संस्थात्मक प्रसुतीत जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे.
अमरावतीपासून 210 कि.मी.वर दुर्गम भागात असणारे धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राची लोकसंख्या 22 हजार तर ग्राम धुळघाटची लोकसंख्या दोन हजार आहे. परिसरातील गोर गरीब व आदिवासी बांधव येथील आरोग्य सेवेचा लाभ घेत असतात. एप्रिल 2020 पासुन ते आजपावेतो 126 प्रसुती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रसुती कक्षामध्ये सुखरुप झालेल्या आहेत.
गत परिस्थीती पाहता जेथे किमान सात टक्केच प्रसुती संस्थेमध्ये होत होत्या. त्या आज 72 टक्केच्या वर जाऊन पोहचल्या आहेत. धुळघाट येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही आरोग्यसेवा कुठेही विस्कळीत होऊ न देता आपले कर्तव्य बजावले. त्यातून संस्थात्मक प्रसुतीच्या प्रमाणात वाढ झाली.
प्रत्येक प्रसुती झालेल्या महिलेस बाळाकरीता हायपोथर्मिया किट, 3 दिवस आवश्यक औषधोपचार आहार व उपस्थित कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील सदस्याप्रमाणे मनमिळावू स्वभाव हया सगळ्या सुविधेमुळे हया प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. मेळघाटातील नागरिकांनी भूमकाकडे न जाता संस्थात्मक प्रसुतीत वाढ होण्यासाठी सतत प्रयत्न होत असल्याने धुळघाटचे हे यश लक्षणीय आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. गोविंद राठोड, डॉ. समाधान डुकरे, आरोग्य सेविका श्रीमती प्रमिला जावरकर, श्रीमती कविता धुर्वे, जि.एन.एम मयुरी कास्देकर, विजया भिलावेकर यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मेळघाट क्षेत्र डॉ. अभिलाष पांडे तसेच अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रेवती साबळे , डॉ. दिपक च-हाटे, श्रीमती कविता पवार यांनी या टिमचे अभिनंदन केले आहे.
Related Stories
December 2, 2023