- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते. त्यासाठी संस्थांनी अर्ज करण्यासाठी मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अधिकाधिक संस्थांनी या यांजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी, अनुदानित व विना अनुदानित किंवा कायम विना अनुदानित, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते. मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, पारशी व ज्यू आदी अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शाळेत शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनातील नियोजन शाखेत 31 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- खालील सुविधांसाठी मिळते अनुदान
शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने, एलसीडी प्रोजेक्टर, सॉफ्टवेअर आदी, इंग्रजी लँग्वेज लॅब, शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे व अद्ययावत करणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, दुरूस्ती, झेरॉक्स मशिन, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आदींसाठी अनुदान मिळते. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डीआयईएस कोड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी इन्स्टिट्यूट कोड, तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुदतीनंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे कळविण्यात आले आहे.