अमरावती : केंद्र शासनाची अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे .तसेच शाळास्तरावर अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर तर जिल्हास्तरावर अर्ज पडताळणीचे अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 राहील, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
केंद्रशासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध , पारसी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इयत्ता पहिली ते दहावी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि -मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरू केली आहे.
इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शासन मान्यता प्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ही योजना लागू आहे. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती रक्कम हजार ते दहा हजार रुपये शासनाद्वारे दिली जाईल. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
—–