- आलो आई तुजकडे
- दुःख सारे माझे हर ।
- तिमिराच्या साऱ्या वाटा
- आई प्रकाशित कर ।।
- आज हट्ट करतोय
- तुझ्या द्वारी रडतोय ।
- तुज प्रसन्न करण्या
- नत चरणी होतोय ।।
- हाल झाले आई माझे
- यात चूक माझी काय? ।
- आहे गरीब म्हणून
- धरू कोणाचेही पाय? ।।
- आहे माणूस म्हणून
- कधी मला जाणतील? ।
- माझ्या गरिबीला कोण
- दुर्लक्षित करतील? ।।
- मज अन्य काही नको
- फक्त दरीला मिटव ।
- दीन आणि श्रीमंतांना
- धडे प्रेमाचे शिकव ।।
- एक होऊन लेकरे
- तुझी सुखाने राहील ।
- तेंव्हातरी कुठे अजु
- तुज सुमने वाहील ।।
- शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७
—–