नवी दिल्ली : कोरोना लस मंजूर झाल्यानंतर दहा दिवसांत ती रोलआउट होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. डीसीजीआयने रविवारी ३ जानेवारीला कोरोना लसीला मंजुरी दिली. यानुसार कोरोना लसीकरण मोहीम येत्या १३ किंवा १४ जानेवारीपासून देशात सुरू होऊ शकते. केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.
सरकार कोरोना लस १0 दिवसांत आणण्यास तयार आहे. कोरोनावरील लसीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे लसीकरण मोहीम १0 दिवसांत सुरू होईल, अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रविवारी अँस्ट्रॅझेनका आणि ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीला मंजुरी दिली होती. देशात पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यात आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक आणि ५0 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस दिली जाईल. देशात ४ प्राथमिक लस स्टोअर अस्तित्त्वात आहेत. ही स्टोअर कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे आहेत. यासह देशात ३७ लस केंद्रे आहेत. या ठिकाणी लस साठवली जाईल. इथून लस मोठ्या प्रमाणात जिल्हा पातळीवर पाठवली जाईल. जिल्हास्तरावरून या लसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या फ्रीजर बॉक्समध्ये पाठवल्या जातील. इथून ही लस नागरिकांना दिली जाईल, असे राजेश भूषण यांनी सांगितले.
भारतात जवळजवळ २ लाख ८९ हजार कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. जिथे या लसी सुरक्षितपणे ठेवल्या जाऊ शकतात. गरजू देशांना कोरोना लस देण्याचे आश्वासन भारताने दिले आहे. भारताने अद्याप कोरोना लसीच्या निर्यातीवर कुठलीही बंदी घातलेली नाही, असे आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.
Related Stories
December 7, 2023