पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) मार्च-एप्रिलमध्ये होणा?्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर करोनाच्या तिसर्या लाटेचे सावट निर्माण झाले आहे.गेल्या वर्षी झालेला परीक्षांचा गोंधळ पाहता राज्य मंडळाला तयारी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत असून, राज्य मंडळ अद्याप ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहे.
राज्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्यात आल्या. सध्या केवळ दहावी आणि बारावीचेच वर्ग सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तिसर्या लाटेचे सावट दहावी-बारावीच्या परीक्षांवर निर्माण झाले आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचे मंडळाचे नियोजन आहे. मात्र परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.