Skip to content
धावपळीच्या त्या शहरातून शोधत
निश्चिंत शांततेचा एक क्षण
होण्यास मुक्त जरा त्या अटळ बंधनातून
जिथे पावित्र्य,औदार्य अन शांतता वसे
घर माझेच माझ्यावर रुसते थोडे
सुन्न करायचेच होते तर का गेलास पुढे
तर आठवणींचा भडिमार दुसरीकडे
तेवढ्यातच अंगणात आम्हा भावंडांचा कल्लोळ मला दिसे
रात्री मग आजीच्या बटव्यातून निघतात गोष्टी अनेक
जादूगर चेटकीण, कधी म्हातारी अन भोपळा तर कधी टोपीवाला एक
त्या गोष्टी पुन्हा ऐकतांना दिसते मग आजोबांची काठी आणि आठवतो त्यांचा रुबाब
अनुभवांची शिदोरी अख्ख्या गावाला पुरे त्यांची अन स्वभाव चोख हजरीजबाब
डोळे माझेच भरून येई जेव्हा भेटीने माझ्या
शोधाया मग त्या जुन्या रानवाटा
अनवानी पाय आणि बाभळीचा काटा
पक्ष्यांच किलबिलणं,फुलपाखरांच फुलणं, पारंब्यावर झुलणं,
नदीच्या शेवाळावर स्वत:ला तोलणं,
जुन्या मित्रांसोबतच्या मैफिली भरवतो आम्ही मग शेतात
ती डबे पार्टी..आंब्याच झणझणीत लोणचं,कुठं हिरव्या मिरच्याचा ठेचा तर बाजरीच्या भाकरी कुणाच्या हातात
होऊनी संतुष्ट कित्येक दिवस त्या आस लागलेल्या जेवणांनी
निसर्गाच्या छपराखाली अन मित्रांच्याच सभोवताली परिसर व्यापतो मग घट्ट मैत्रीच्या उफाळलेल्या भावनांनी
परततांना पण चिंचा बोराने,प्रेम आणि आपुलकीच्या मोहराने भरतो आम्ही खिसे
आठवतात जीव लावणारे मास्तर, ओसंडून वाहणारा त्यांचा जिव्हाळा
तिथल्या चिमुकल्यांमध्ये मी शोधतो स्वत:ला,
पडतो त्या मैदानावर पुन्हा पुन्हा
वाजताच घंटी शाळेची येते भान,
कळते तो काळ आता झाला रे जुना
मागच्या बाकावर धुमाकूळ घालणारे ते तिघे वाटे जणु आमचेच आरसे
अशाच कित्येक आठवणी करून ताज्या, कॅमेऱ्यात डोळ्यांच्या प्रत्येक क्षण करून कैद
परतूनीया जाण्याची वेळ आता झाली कळताच जरा वाटतो मनाला खेद
पण वचन पुन्हा येण्याचे घेऊनच
सोडतात मला ती हक्काची ‘आपली माणसे’
Like this:
Like Loading...