जालना : राज्यात ८२ टक्के पहिला डोस नागरिकांना देण्यात आला आहे. तर, ४४ टक्के लसीकरण दुसर्या डोसचे झाले आहे. साडेसात कोटी लोकांना पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात लसीकरण वेगाने सुरू असून उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपयर्ंत लसीकरण सुरूच राहील. सद्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारखे कोणतेही कारण नाही, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
परदेशातील भारतात येणार्या प्रवाशांबाबत सरकारने सावध पावले उचलली आहेत. अशातच राज्यांतर्गत प्रवास करणार्यांवरही सरकारने निर्बंध आणले आहेत. याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणार्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक नसणार. पण, ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांतून आलेल्या नागरिकांना आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची असणार असून सात दिवस क्वारंटाईन राहणे बंधंनकारक राहील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या नवीन स्वरूपाचा ओमायक्रॉन हा विषाणूने दक्षिण अफ्रिकेसह काही देशांत हाहाकार माजवला आहे. या विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे काही देशात पुन्हा कडक निर्बंध करण्यात आले आहेत. भारत सरकारनेही या बाबत त्वरित बैठक बोलावून सर्व राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तर, राज्यांना, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.