– 482 घरकुलांचा प्रकल्प अहवालही मंजूर
अमरावती, दि. 28 : तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुलांसाठीचा प्रलंबित निधी मिळण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून, लवकरच तो प्राप्त होऊन कामांना गती मिळेल. त्याचप्रमाणे, ४८२ नवीन घरकुलांचा प्रकल्प अहवाल सुद्धा मंजूर करण्यात आला असून, लवकरच ही कामेही मार्गी लागतील.
तिवसा नगर पंचायत येथील पहिल्या प्रकल्प अहवालातील ९८ घरकूलांचा ३ आणि ४ था हप्ता गेल्या ८ महिन्यापासून प्रलंबित होता. पहिले दोन हप्ते वितरीत झाले होते. उर्वरित हप्ते बाकी असल्याने लाभार्थ्यांपुढे अडचण निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, तसेच म्हाडा प्रशासनाला पत्रही दिले, तसेच अधिका-यांशी चर्चा करून तत्काळ उर्वरित हप्त्याचा निधी देण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनीही म्हाडा अधिका-यांशी भेट घेऊन निवेदन केले. त्यानुसार निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, घरकुलाच्या कामांना गती येणार आहे.
पहिल्या ९८ घरकुलांचा उर्वरित ५८ लक्ष ८० हजार रु.निधी येत्या तीन दिवसांत नगर पंचायतीकडे जमा होणार आहे. त्याबाबतचा निधी वितरण आदेश काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, 482 घरकुलांच्या प्रकल्प अहवालाला मान्यता मिळाली असून, अनुज्ञेय निवारा निधीतुन निधी वितरित करण्याबाबत आदेश जारी झाले आहे.