नागपूर : राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदाची १५ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने तासिका तत्त्वावर शिकविणार्या प्राध्यापकांवर मोठा भार पडला आहे. मात्र त्यांचे मानधन फारसे नसल्याने, मानधनात वाढ व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तासिका तत्त्वावर काम करणार्या प्राध्यापकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यात व्हेंटिलेटरचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यासंबंधाने मंत्री उदय सामंत विदर्भ दौर्यावर आहे. मंगळवारी त्यांनी ३0 व्हेंटिलेटरचे वाटप केले. राज्यभरात व्हेंटिलटर वाटप करण्यासाठी ते दौरा करीत आहेत. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी प्राध्यापक भरती आणि इतर मुद्यांवर संवाद साधला. राज्य सरकार प्राध्यापक भरतीसाठी सकारात्मक असून वित्त विभागानेही मंजुरी दिली आहे. प्राध्यापक भरतीसंदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. पदभरतीची मान्यता मिळताच लवकरच पदे भरली जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. प्राध्यापक भरतीसाठी सुरुवात झालेली आहे. ११00 ते १२00 प्राध्यापक पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोना काळामुळे ती स्थगित करण्यात आली. पण लवकरच प्राध्यापकांची पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कायमच सकारात्मक आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी वित्त विभागाने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परीक्षा आणि शिक्षण सध्यातरी ऑनलाईनच ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. बारावीचा निकाल परीक्षेशिवायच लागणार असला तरी प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश परीक्षा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024