- लसीकरणाला गती
अमरावती : कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला असून, १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण होण्यासाठी सर्व तालुक्यांत तालुका शिक्षणाधिका-यांच्या समन्वयाने मुख्याध्यापकांच्या आढावा सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
दरम्यान, दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांचे लसीकरण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. अमरावती तालुक्यातील दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना दूरध्वनीद्वारे लसीकरण करून घेण्याचा संदेश देण्यात आला, सुमारे ११ हजार ४९० जणांना दूरध्वनी संदेशाद्वारे आवाहन करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली. याबाबत ठिकठिकाणी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आवाहनवजा संदेश प्रसारित केले जात आहेत.
कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ठिकठिकाणी ही कारवाई करून सार्वजनिक शिस्त पाळली जाईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.