- ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे खासगी क्षेत्राला उपराष्ट्रपतींचे आवाहन
- कोविड–19 महामारीशी लढा देण्यासाठी लवकरच स्वदेशी लस सुरू होत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला आनंद
नवी दिल्ली (PIB) : आधुनिक जीवनशैलीमुळे येणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी आणि अ-संसर्गजन्य रोगांपासून (एनसीडी) बचाव करण्यासाठी, उपराष्ट्रपती वेंकैया नायडु यांनी नागरिकांना नियमित योग आणि ध्यान करण्याची सवय तसेच आपल्या पारंपरिक खाद्य सवयी अंगी बाणण्याचे आवाहन आज केले.
हैदराबाद येथे सोसायटी ऑफ कोरोनरी सर्जन्स (हृदय शल्यविशारद गट) यांचा आभासी पद्धतीने प्रारंभ करताना, त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की वैज्ञानिक समुदायाने असा निष्कर्ष काढला आहे की हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग (सीव्हीडी) यामध्ये वाढ होण्यास अयोग्य जीवनशैली हेच मुख्य कारण आहे. “योग केल्यामुळे तणाव दूर होतो आणि रोगाचा त्रास दूर होतो. त्यामुळे, योग हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य दिनक्रम झालाच पाहिजे,” त्यांनी नमूद केले.
डब्ल्यूएचओचा दाखला देत, नायडू म्हणाले अ-संसर्गजन्य रोगांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबधी, तीव्र श्वसनाचा रोग, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या मोठ्या आजारांचा समावेश आहे आणि जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळजवळ 41 दशलक्ष (71 टक्के) आणि भारतातील सर्व मृत्यूंपैकी 5.87 दशलक्ष (60 टक्के) मृत्यू यामुळे होतात.
अ-संसर्गजन्य आजाराची वाढ ही मुख्यतः बैठे काम करण्याची पद्धत, अनारोग्य आणि अन्नपदार्थ सेवनाच्या अनियमित पद्धती, धूम्रपान आणि तंबाखू खाणे अशा बदललेल्या जीवनशैलीमुळे होते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. अ-संसर्गजन्य रोगाच्या साथीने व्यक्ती, कुटुंब आणि समाजासाठी विनाशकारी परिणाम घडवून आणले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग (सीव्हीडी) आणि त्यांच्यामुळे लोकांवरील परिणाम आणि त्यादृष्टीने होणारी हानी रोखण्याच्या उद्देशाने सोसायटी ऑफ कोरोनरी सर्जन तयार करण्याच्या पुढाकाराचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.
उपराष्ट्रपतींनी एससीएसच्या सदस्यांना ग्रामीण भागावर असलेला रोगांचा ताण यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
ग्रामीण भागात आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या दरांमध्ये सार्वजनिक – खासगी भागीदारीच्या माध्यमातून खासगी क्षेत्राने सरकारच्या सहयोगाने आधुनिक आरोग्य चिकित्सा केंद्र आणि उपचार सुविधा निर्माण कराव्यात आणि परवडणारे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
उपराष्ट्रपती म्हणाले की, विमा सुरक्षा कवच वाढविण्याची मोठी गरज आहे. आयुष्मान भारत हा एक खरोखरच प्रशंसनीय उपक्रम आहे जो गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना आरोग्य संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो, यावर त्यांनी भर दिला. सर्वांना परवडणारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि उपचार खर्च कमी करण्याची खात्री द्यावी, यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांना आवाहन केले.
अलिकडच्या वर्षांत हा देश वैद्यकीय पर्यटनस्थळ म्हणून उदास आला असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की “हृदय विकारावरील उपचार करण्याच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावरील उत्तमता म्हणून उदयास आला असतानाच दुसऱ्या क्रमांकावरील सीएबीजी (कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट) पद्धतीच्या शस्त्रक्रिया याच देशात करण्यात आल्या आहेत.”
“कोविड – 19 महामारीच्या काळात आपल्या आरोग्यचिकित्सा विषयक क्षमता देखील स्पष्टपणे स्थापित झाल्या आहेत आणि जगातील काही प्रगत देशांच्या तुलनेत मृतांची संख्या खूपच कमी होती,” यावर त्यांनी भर दिला. स्वदेशी पद्धतीच्या लसीला लवकरच प्रारंभ होणार असल्याबद्दल, त्यांनी आनंद व्यक्त केला.