मागील १० हजार वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अश्या जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली. त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. ह्याचा भारतीय म्हणून आपल्याला सार्थ अभिमान आहे. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.
‘ बुद्ध ‘ हे नांव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे ” आकाश एवढा प्रचंड ज्ञानी ” आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. बुद्धांच्या धम्माला बौद्ध धम्म किंवा बुद्धिझम म्हणतात.
सर्व खंडातील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धम्म हा मुख्य आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. इ.स.२०१० मध्ये जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती. बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्धांचे जगात सर्वाधिक अनुयायी २.३ अब्ज असलेले सर्वाधिक प्रभावशाली धम्म संस्थापक तत्वज्ञ आहेत.
गेल्या एक वर्षापासून आपला देश नाही तर संपूर्ण विश्वच कोरोना महामारीने ग्रस्त आहे. प्रत्येकजण एका विशिष्ट तणावात असून भयभयीत सुद्धा आहे. लॉक डाउन व इतर प्रतिबंधामुळे आपल्या हालचालीवर निर्बंध आल्यामुळे सर्वजण घरातच बंदिस्त झालेले आहेत. एक वर्षभर घरातच अडकून बसल्यामुळे ते एक विशिष्ट मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे कोरोना आपल्या वेगवेगळ्या रूपात मानवावर हल्ले करीत आहे. ह्यातून बाहेर पडण्यासाठी मानव जोरकस प्रयत्न करतो आहे. विविध मार्ग चोखाळतो आहे. असंख्य पर्याय शोधल्यानंतर त्याला एक हमखास मार्ग दिसतो आहे. तो म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा “धम्म आणि विपश्यना “.
ह्या सध्याच्या ताणतणावातून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल तर सुमारे २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी शोधून काढलेली विपश्यना साधना ही होय. विपश्यना, म्हणजे जे जसे खरोखरी आहे, तसे त्याला पाहणे. विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यान पद्धतींपैकी एक आहे. ती सार्वत्रिक रोगांसाठी सार्वत्रिक उपाय, अर्थात जीवन जगण्याची कला ह्या रूपात सर्वाना सुलभ अशी बनवली आहे. ही एक उत्तम जीवन जगण्याची कला सुद्धा आहे. ह्या सार्वजनिक ध्यानपद्धतीचे मुख्य लक्ष्य म्हणजे मानसिक अशुद्धता पूर्णतः काढून टाकणे आणि परिणामी संपूर्ण मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळविणे हे आहे.
विपश्यना ही आत्मनिरीक्षणाद्वारे स्व-परिवर्तन एक मार्ग आहे. विपश्यना हे मन आणि शरीरामध्ये असलेल्या खोल आंतरिक संबंधांवर लक्ष्य केंद्रित करते. जी थेट शरीराच्या चेतना निर्माण करणाऱ्या भौतिक, शारीरिक संवेदनांवर शिस्तीने लक्ष्य देऊन अनुभवली जाऊ शकते आणि ही मनाच्या चेतनेला सतत परस्पर संबंध आणि स्थितीमध्ये ठेवते. मन आणि शरीराच्या सर्वसाधारण मूलस्वरुपावर हे निरीक्षण आधारित, स्वयं अन्वेषणात्मक प्रवास आहे, जे मानसिक अशुद्धता वितळविते आणि परिणामस्वरूप प्रेम आणि करुनायुक्त संतुलित मनांमध्ये परिवर्तित होते.
आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदना ज्या वैज्ञानिक नियमानुसार चालतात ते सिद्धांत स्पष्ट होऊ लागतात. आपल्या प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला समजते की, विकार कसे उत्पन्न होतात, बंधने कशी बांधली जातात आणि त्यापासून कशी मुक्तता मिळू शकते. जागरूकता, भ्रांतीमुक्तता, स्व-नियंत्रण आणि शांतता हे जीवनाचे गुणधर्म बनून जातात.
हल्ली विपश्यना साधनेचे तंत्र अवगत होण्यासाठी दहा दिवसांच्या निवासी शिबिरापासून तर ३० दिवसांच्या शिबिरांचे आयोजन केले जातात. ह्या असल्या शिबिरात नैतिक वर्तणुकीच्या ह्या साध्या शीलांमुळे मन शांत कसे होते ह्यावर प्रकाश टाकला जातो. तसेच पुढील पायरी म्हणजे आपले लक्ष्य नैसर्गिकरित्या नाकपुडीत येणाऱ्या व जाणाऱ्या बदलत्या श्वासाच्या प्रवाहाकडे लक्ष्य केंद्रित करून मनाला वश करण्याची कला विकसित केली जाते. तसेच शिबिरात सर्वांप्रती करुणा किंवा सदभावना म्हणजे ” मंगल मैत्री ” ची साधना यावर सुद्धा भर दिला जातो.
विपश्यना ही संपूर्ण प्रक्रिया वस्तुतः एक मनाचा व्यायामच आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होतो. विपश्यना हे मानवी जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी एक प्रभावशाली तंत्र सुद्धा आहे.
ह्या भगवान बुद्धांच्या अनमोल विपश्यनेचा उपयोग आपण कोरोनावर मात करण्यासाठी करू शकतो. आज गरज आहे आपल्या देशातील ह्या बहुमूल्य तंत्राचा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व त्याचा उपयोग करून घेण्याचा.
नातेसंबंधावर परिणाम : गेल्या वर्षभरापासून आपण घरातच बंदिस्त आहोत. घरूनच शाळा, अभ्यास, ऑफिस, व्यायाम हे सर्व उपक्रम करत आहोत. आपण सर्व कुटुंब गेल्या वर्षभरापासून एकत्रच आहोत. सुरुवातीला आपल्याला एकत्र कुटुंब म्हणून फार बरे वाटले. परंतु आता एकत्र कुटुंबाचे संबंधावर परिणाम दिसायला लागले. आज आपण आई-वडील, पती-पत्नी, भाऊ-बहीण, सासू-सासरे-सून ह्या पर्यंतच नाते संबंध मर्यादित ठेऊ शकलो आहोत. नाते संबंधा मध्ये गौतम बुद्धांनी मैत्री ह्या संबंधावर अधिक दृढ विश्वास असल्याचा उपदेश दिला आहे. गौतम बुद्ध म्हणतात मैत्री संबंध हे रक्ताचे जरी नसले तरी ते आपण निर्माण केलेले असतात. मैत्री म्हणजे विश्वास. मैत्रीचे संबंध हे कायमस्वरूपी असतात. एकवेळ प्रेम हा धोका देऊ शकतो. प्रेमाचे संबंध संपुष्टात येऊ शकतात. प्रेमाचा हा अतिरेक सुद्धा होऊ शकतो. प्रेमात जबरदस्ती केली जाते. परंतु मैत्री मध्ये जबरदस्ती केल्या जात नाही. मित्र हा कोणीही असू शकतो आणि वर्षभरात हे मैत्रीचे संबंध संपुष्टात आल्यामुळे, विचारांचे आदान-प्रदान न झाल्यामुळे कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला आहे. म्हणून मैत्रीपूर्ण संबंध जर वृद्धिंगत झाले तर नक्कीच आपण कौटुंबिक संबंध वृद्धिंगत करू शकतो व मैत्रीच्या संबंधाचा बूस्टर डोस देऊन आपली इम्युनिटी पावर वाढवून कोरोनावर मात करू शकतो.
गौतम बुद्ध म्हणतात मैत्री करा. शेजाऱ्यावर, सहकाऱ्यांवर, मित्रांवर प्रेम करा, देण्याचा भाव ठेवा. परंतु आज परिस्थिती काय आहे ? सर्वाना भेटो पण शेजाऱ्याला, नातेवाईकाला, सहकाऱ्याला, मित्रांना ना भेटो. ही भावना आहे. गौतम बुद्ध म्हणतात ध्यान करा, विपश्यना साधना करा. ज्ञान प्राप्त करा व ते इतरांना सुद्धा वाटा. पण आपली मानसिकता काय आहे ? सर्वांना ध्यानाचा फायदा मिळो पण शेजाऱ्याला नाही. गौतम बुद्ध म्हणतात की, अडचण इथेच आहे, हीच भावना, शेजाऱ्याला ना मिळो ही विचारधाराच घातक आहे. माझ्या ध्यान साधनेचा फायदा हा शेजाऱ्याला प्रथम मिळो मग तो इतरांना मिळो. शेजाऱ्याला फायदा मिळाला तर त्याचा पाझर शेजाऱ्या पासून इतरांना मिळेल. हा खास मैत्री पूर्ण संदेश गौतम बुद्धांनी दिला. त्यामुळे वैरच संपुष्ठात येईल. आपण अजूनही त्याच मानसिकतेत असल्यामुळे आपण त्या विवेंचनेतून बाहेर पडू शकत नाही व मानवी दुःखाचे हेच एकमेव कारण आहे. गौतम बुद्ध म्हणतात आपले ध्यान हे संपूर्ण प्राणिमात्रा मध्ये वाटा.
आपण साध्या कठीण संक्रमणातून जात आहोत. ह्या कठीण संक्रमणावर मात करण्यासाठी गौतम बुद्धांचा धम्म व विपश्यना कोरोना महामारीवर मात करण्यासाठी नक्कीच मदतगार ठरेल अशी बौद्ध पौर्णिमा मंगल दिनी कामना करूया. बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
अरविंद सं. मोरे,
नवीन पनवेल पूर्व
मो.९४२३१२५२५१, ई-मेल:arvind.more@hotmail.com