मानवाची निर्मिती कशी झाली . पृथ्वीतलावर त्याचे अस्तित्व कसे निर्माण झाले या विषयी अनेक दंतकथा निर्माण झाल्या आहेत. प्राचीन काळातील दंतकथेतून मानव हा कोणत्यातरी गुढ अश्या शक्तीने निर्माण झाला आहे.पण या दंतकथेला प्रमाणित म्हणता येत नाही .कारण विज्ञानाच्या कसोटीवर हा विचार खरा उतरत नाही. प्राचीन काळाच्या अभ्यासांती हाती आलेला पुराव्यानुसार व विज्ञानाच्या संशोधनातून मानव हा अश्मयुगाच्या प्रारंभ काळात निर्माण झाला असावा असा कयास लावण्यात आला.मानवाने आपल्या बुध्दिसामर्थ्याने प्रगतीचे नवे नवे क्षितिज काबीज केली आहेत.रानावनात कडेकपारीत राहणारा हा मानव अग्नीच्या शोधामुळे स्थिरावला व शेती करू लागला.नव्या नव्या कल्पकतेतून स्वतःचा विकास करू लागला .तोच परिवर्तनवादी विचारगर्भशीलतेचा सृजनत्व माणूस आजच्या विकसित मानवाचा प्रेरणास्त्रोत आहे.
पूर्वीच्या मानवात चढाओढ होत होती.स्वतःचे सामर्थ्य दाखवण्यासाठी काही स्पर्धा होत होत्या .पण त्यांच्यात भेदाभेद दिसत नव्हते.त्याच्या गरजा मर्यादीत स्वरूपात असल्याने कधीही अत्याचार व अन्यायकारी व्यवस्था पाहायला मिळत नव्हती .मानव स्वःभाव मुळातच भावनाप्रधान,सहकार्यात्मक,
प्रेमस्वरूप,असा आहे.पण कालखंडाच्या बदलत्या प्रवाहाने मानवात अनेक भेदभेद निर्माण केले.माणूसच माणसाविरूध्द वागू लागला.मानसाचे माणूसपण नागवले जावू लागले.हे इतिहासातील घडणाऱ्या घटनेच्या अभ्यासातून पाहायला मिळते.विषमतामय विचारसरणीला समाप्त करून मानवतावादी समाजाची उभारणी करण्याचे महान कार्य अनेक तत्ववेत्यांनी केले.जगातील पहिला मानवतावादी विचारवंत म्हणून तथागत गौतम बुध्द यांनी नव्या धम्मज्ञानातून मानसाला नवे आत्मभान दिले.अत्तदीपभवः चा मूल्यजागर केला.
धम्माने मानवाला नव्या वैचारिक क्रांतीची ऊर्जा प्रदान केली.काळाच्या प्रवाहात अनेक धर्म निर्माण झाले .समाजातील विषम व्यवस्थेविरूध्द एल्गार केले .मानवी समाजाला नवे चैतन्य निर्माण केले.त्यात तथागत गौतम बुध्द,येशू ख्रिस्त,गुरूनानक,चक्रधरस्वामी,
हजरत महमंद पैंगबर,बसेश्वर , संत कबिर,संत तुकाराम महाराज, यांनी समाजातील वाईट विचारांवर जोरदार हल्ला चढवला.संत कबीराचे काव्य मानव मक्तीच्या लढ्यासाठी होते .माणसाने माणसावर लादलेल्या गुलामगिरीतून माणसाला मुक्त करण्यासाठी काव्य लिहले.माणसाला कायमचे गुलाम करू बघणाऱ्या समाजव्यवस्थे विरूध्द कबीरांचे बंड होते.
जगामध्ये अनेक मानवतावादाचे पुरस्कर्ते होऊन गेल्यावरही जगातील शोषण थांबले नाही.
अनेक पुरस्कर्ते धर्माच्या चौकटी भेदू शकले नाही.धर्मग्रंथाच्या नियमात मानसाला बसवून माणसाचे अतोनात शोषण केले.
तथागत गौतम बुध्द् यांनी मानवाला जी प्रतिष्ठा दिली ती अनेक शतकात न मिळाल्याने जगात अन्यायकारी व्यवस्था निर्माण झाली .भारतात असलेली अन्यायकारी व विषमतवादी समाजव्यवस्थेने पंच्याऐंशी टक्के स्वः बांधवाना अमानवीय कौर्यभरी व्यवस्थेने गुलाम करून ठेवले.प्रस्थापित समाजातील बोलत्या नेत्यांनी कृतीशीलत्व न घेतल्याने मानवीय जीवन अंधकारमय झाले होते.महात्मा जोतीराव फुले ,शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘समाजपरिवर्तनाची नवी दिशा समाजाला देऊन बहुजनात नवी क्रांती पेटवली.महात्मा जोतीराव फुले लिहितात की,
- “कोणास न पिडी कमावलें खाई ।
- सर्वां सुख देई ।आनंदांत।।
- खरी हीच नीती मानवाचा धर्म ।बाकीचे अधर्म ।जोती म्हणे ।।”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानक्रांतीच्या बळावर विदेशी व स्वदेशी राज्यव्यवस्थेविरूध्द महाआंदोलन केले.मानववंशशास्त्रचा अभ्यास केला.स्वःताच्या वाटेला आलेल्या अस्पृश्यतेचे दाहक चटके शहण केले.या अग्नीज्वालेतून मानवमुक्तीचा महासंगर लढले.माणसाच्या माणूसपणसाठी अविरत संघर्ष केला त्यातूनच नवा मानवतावाद घडून आला.
मानवतावादाचा उगम हा प्राचीन सिंधु संस्कृती व ग्रीक संस्कृती या सभ्यतेत पाहायला मिळते.तत्कालीन ऐतिहासिक दस्ताएेवजानुसार पूर्वीचा माणूस नक्कीच समाजप्रिय होता हे लक्षात येते.पण या समाजप्रिय मानवात जाती -पाती,धर्म-अधर्म ,या विकृत विचाराची निर्मिती करून मानवतेवर मोठा अन्याय केला.यज्ञयाग,अस्पृश्यता,
अमानवीय व्यवहार , शिक्षण बंदी,कामबंदी,स्त्री शोषण या व्यवस्थेला समाप्त करण्यासाठी ,मानवाच्या उत्थांनासाठी , दुःखमुक्तीसाठी ,नवे तत्वज्ञान नवे चिंतन होऊ लागले यातूनच मानवतावादी विचाराचा उगम झाला.
विकास हा मानवी समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे.मध्ययुगाच्या अंधकारमय जगातून प्रबोधनकाळाचा प्रारंभ झाला.त्यातून मानवतावादी आंदोलनाची सुरूवात झाली.पुरोहितशाहीच्या बंधनातून मुक्त झालेल्या समाजाला मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभली.नव्या वैैज्ञानिक दृष्टीने मानवाला नवी विचारसापेक्षता प्रदान केली.प्लेटो,अँरिस्टाँटल ,यांनी नवे मानवी ग्रंथ लिहून नवतत्वज्ञानाची मांडणी केली.प्रोटोगोरस,बुकानान,हर्डर,यांनी मानवतावादावर चिंतन केले.
जगातील सर्व माणसाचा भौतिक,नैतिक व आध्यात्मिक विकास करणाऱ्या विचारसरणीला मानवतावाद असे म्हणतात.”मानवतावाद प्रकाश की वह नदी हा जो सीमीत से असीमीत की और जाती है।
मानवतावादाच्या मीमांसेत तीन प्रकार पाहायला मिळतात.१)तत्व-विश्वाच्या विचाराचा केंद्र बिंदू मानव आहे.
२)ज्ञान-स्वतःच्या कौशल्याने ज्ञान प्राप्त करणे.
३)मूल्यं-मानवामध्ये लवचिकता असावी , प्रगती करण्याची क्षमता असावी आणि भविष्य करणारा शिल्पकार बनावा.
यावरून असे लक्षात येते की,मानवाने माणसासारखे वागणे म्हणजे मानवतावाद होय.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी सर्व माणसाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहर्निश कष्ट घेतले.महाड चवदार तळे महाआंदोलनात ठराव मांडतांना म्हटले आहे की,”सर्व माणसे जन्मतः समान दर्जाचीच आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील.लोकोपयोगित्वाच्या दृष्टीनेच त्यांचा दर्जात फरक पडू शकेल.एरव्ही त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहला पाहिजे म्हणून कारभारात आणि सार्वजनिक व्यवहारात समानतेच्या तत्वाला बांधा येईल अशा कोणत्याही धोरणाला व विचारांना थारा मिळू नये या सभेचे मत आहे.”हा ठराव म्हणजे डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांची क्रांतीकारी सुरूवात होती.
मनुस्मृतीमधील सामाजिक,आर्थिक व राजकीय व्यवस्था अमानवीय असल्याने ही सर्व पुराणग्रंथ जाळले पाहिजे असे त्यांचे मत होते.अमानवीय असलेल्या सर्व चालीरीती कायद्याने नष्ट कराव्या मानवाला स्वातंत्र्य,समता,न्याय व बंधूभाव या गोष्टीची गरज आहे.मानवाच्या उन्नतीसाठी त्यांना हक्क पाहिजे ते हक्क मानवविकासाचा आरंभ बिंदू आहे.भारतीय समाजाला जी विषमताय व्यवस्था होती तीला नष्ट करणे हेच त्यांचे ध्येय होते.या ध्येयातूनच मानवतावादाची खरी वास्तविकता लोकांना समजवून दिली.माणसाविषयी तुच्छता व्यक्त करणाऱ्या धार्मिक शिकवणूकीवर टीका करताना फॉयरबाख म्हणतो की,”माणसाविषयीचे प्रेम साधित नसावे , ते आद्यप्रधान असले तरच सत्यस्वरूप , पवित्र आणि विश्वसनीय प्रेरणा म्हणून राहील .तर मानवी सारतत्व हे माणसाचे उच्चतर व आद्य नियम असले पाहिजे.” पुढे ते म्हणतात की,”त्यासाठी माणसाने धार्मिक अस्तित्वाशीवाय दुसरे आदर्श निर्माण केले पाहिजेत .आपला आदर्श हा विसंगत ,शरीरहीन,अमुर्तं प्राणी नव्हे.आपला आदर्श हा संपूर्ण खरा , सर्वांगीण परिपूर्ण ,सुशिक्षित मनुष्य प्राणी आहे.आपल्या आदर्शास केवळ आत्म्याची मुक्तीच समाविष्ट नसावी,तर ऐहिक परिपूर्णता , ऐहिक कल्याण व आरोग्यही समाविष्ट असावे.” हा युक्तीवाद अत्यंत क्रांतीदर्शी व मूलगामी वाटतो.थॉमस मूरनेही मानवतावादी विचारक्रांतीवर मत व्यक्त करताना “युटोपिया” या ग्रंथात म्हटले आहे की,”या जगातील कोणतीही कल्पना माणसाच्या जीवनाशी सममूल्य असू शकणार नाही.दुसऱ्या राष्ट्रांना गुलाम करण्याकरीता व लुटण्याकरीता जितांना जेत्यांवर परावलंबी करणारी जेत्यांपुढे त्यांना नकमस्तक व्हावयास भाग पाडणारी युध्दे मूरने मानवतावादी दृष्टीकोनातून त्याज्य ठरवली होती.
मानव हा सामाजिक प्राणी आहे.तसाच तो राजकिय प्राणी आहे.आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तो सातत्याने धडपडत असतो.या धडपडण्याला स्वतंत्रता लाभली तर तो नव क्रांती करू शकतो.माणसाचे मन स्वतंत्र असावे यावर तथागत गौतम बुध्द् म्हणतात की,”मानव हा जळता अग्नी आहे.विकार हे या अग्नीमुळे पाण्यासारखे उकळत असतात .अग्नी चेतवता येतो किंवा शांत करता येतो.विकार नाहिसे करता येतील परंतु समुळ उपटून टाकता येत नाहीत.अग्नीचा उपयोग करून घेण्यासाठी तो जसा मंद ठेवून अन्न शिजवून घ्यावे त्याप्रमाणे मानवाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी मधील स्थिती निर्वाण ही होय.त्यामुळे दश विकारांच्या आधीन न जाता मानव तर्कशुध्द विचारसरणी ठेवून समाज उपयोगी कार्य करू शकतो.”हा इशारा मानवतावादी विचारप्रवर्तकानी लक्षात घ्यायला हवा . सामाजिक,आर्थिक व राजकीय क्रांतीतून मानवाचे कल्याण करता येऊ शकते असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे होते.
भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेबाचा खरा मानवतावाद प्रतिबिंबित झाला आहे.भारतीय संविधानाचा पाया हा मानव केंद्री आहे. मानवाच्या प्रगतीची महाऊर्जा प्रज्वलीत करण्याचे काम संविधान करत आहे.मुलभूत अधिकार व मार्गदर्शन तत्वे यामधून भारतीय समाजाला नवा क्रांतीकारी पथदर्श मिळाला आहे.भारतीय सर्व समाजाचा विकास करायचा असेल तर राजकर्ते व लोकांनी कायद्याचे नीतीमूल्य व नैतिकतेचा आधार घ्यावा.आपल्या ज्ञानाचा उपयोग शोषण व दुःख वाढवण्यापेक्षा देशाच्या समृधीसाठी करावा.मानवीय सभ्य समाज निर्मितीकरीता संविधानातील मानवतावाद आपण समजून घेतला पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समाजाला केंद्रभूत घटक न मानता व्यक्ती हा विकासाचा केंद्र मानला आहे.कारण व्यक्तीच्या विकासावरून देशाच्या प्रगतीचे मोजमापण करता येते.
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.जगातील अनेक राष्ट्रांना भारतीय लोकशाहीने प्रेरणा दिली आहे.भारतीय धर्मनिरपेक्षतेला एका धाग्यात गुफंण्याचे काम संविधानाने केले आहे.लोकशाहीतील राष्ट्रवाद नव्या मानवाची निर्मिती करू शकतो तर राजकिय पक्षाचा राष्ट्रवाद अंहकारी ,भेदाभेद व तकलादू करणारा असतो अशा मायाजाली राष्ट्रवादाच्या कंपूपासून आपण सावध राहावे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी अनेक धर्माचा अभ्यास केला .त्यांना मानवाचे सर्व कल्याण करणारा सन्मार्ग बुध्द् धम्मात पाहायला मिळाला.पंचशील तत्वे व वैज्ञानिक दृष्टीकोन हा मानवी समाजाचा पाया आहे.या विचारांने मानवात खरा बंधूभाव निर्माण होऊ शकतो.१४ ऑक्टोंबर १९५६ ला नागपूरच्या नागभूमीत महास्थविर चंद्रमणी यांच्या हस्ते धम्मचक्र प्रर्वतन करून विश्वकल्यानाचा धम्मपथ स्वीकारला .ही एक जागतिक पातळीवरील मानवतावादी विचारक्रांतीच होती.आज जगाला धम्मातील नीतीतत्वाची गरज वाटत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सर्व मानवाचे उन्नयन व्हावे ही अपेक्षा अभिप्रेत होती.त्याच्यावर अनेक वाईट प्रसंग आले तरी त्यांनी आपली मानवीय क्रांतीजाणिवा कमी केल्या नाही.कोणताही दुश्वास ठेवला नाही तर जगातील सर्व मानवाना त्यांचे अधिकार मिळावे यासाठी संघर्ष केला.कोणताही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहणार नाही.तसेत त्यांचा सामाजिक , आर्थिक व राजकीय विकास व्हावा याची तरतूद संविधानात करून ठेवली.पण वर्तमान व यापूर्वीच्या राजसत्तेने भारतीय संविधानाची योग्य अंमलबजावनी केली नाही.संविधानाविषयी पूर्वग्रहदूषितपणा व श्रेष्ठजनाची मानसिकता यामुळे लोकशाही चक्रव्युहात सापडली आहे.भांडवलदार्जीण्य व ब्राम्हणी विचारसरणीचे सरकार सत्तेवर आल्याने मानवाला माणसापासून तोडत आहेत.राजकर्त्याच्या अज्ञानामुळे संविधानात्मक मूल्यांची पायमल्ली केली जाते . यशवंत मनोहर आपल्या संविधानविषयी विचारात म्हणतात की,”भारतीय संविधान मूल्यकोश इहवादी आहे.समाजवादी आहे.माणसाच्या संबंधाची मानवतावादी दृष्टीने चिकित्सा करणारा आणि वैज्ञानिक पध्दतीशास्त्रानुसार पुनर्रचना करणारा मूल्यकोश आहे.”
वैश्विक विचारविश्वाला आंबेडकरांचा मानवतावादी विचार आजच्या काळाची गरज आहे.शोषित ,वंचित,पिडीत,स्त्री,शेतकरी,कामगार,सैनिक,विद्यार्थीयांना जगण्यासाठी ऊर्जा देणारा , लढण्यासाठी प्रेरणा देणारा , अमानुषतेवर प्रहार करणारा, मूल्यसापेक्ष समानतेचा नवा क्रांतीसूर्य आहे.आंबेडकराचा मानवतावाद भारताला व जगाला नव्या परिवर्तनवादी विचारांकडे घेऊन जाणारा दीपस्तंभ आहे.आज याच मानवतावादी कार्यऊर्जेशिवाय दुसरा कोणताही विचार देशाला एकसंघ ठेवू शकत नाही.म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावाद आज काळाची नितांत गरज आहे.
- -संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००