मुंबई : सिल्वासा, दादरा- नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, अशी शंका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून राऊतांनी मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केले आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. काँग्रेसने तर भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर शिवसेनेनेही डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात शंका व्यक्त केली आहे.
सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात आत्महत्या करू नये. निराश होऊ नये, असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वत:चा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?, असा सवालही त्यांनी केला आहे.
मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024