अमरावती : मेळघाट वनक्षेत्राअंतर्गत येणार्या हरिसाल वनक्षेत्र येथे परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) पदावर कार्यरत असणार्या दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास सर्व्हिस क्वॉर्टरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी अपर संचालक तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रेड्डी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे धारणी पोलिस स्टेशन येथे आरोपी शिवकुमार यांच्याविरोधात ३0६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, डीएफओ विनोद शिवकुमारला एलसीबी तसेच धारणी पोलिसांनी नागपूर रेल्वे स्टेशन येथून पळून जात असताना अटक केली आहे.
हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वन विभागासह संपूर्ण जिल्ह्य़ात चांगलीच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. दरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकारी रेड्डी याच्या नावाने चार पानांचे पत्र लिहून वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. डीएफओ विनोद शिवकुमार हे मानसिक तसेच शारीरिक त्रास देऊन नियमाबाह्य़ कामे करण्याचे सांगतात. तसेच रात्री-अपरात्री बोलावून शिवीगाळ करतात, असेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर धारणी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. धारणी पोलिस स्टेशन येथे आरोपी विनोद शिवकुमार याच्याविरोधात ३0६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकुमारला नागपूर रेल्वे स्टेशन येथून पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणाचे राजकीय क्षेत्रातदेखील पडसाद पहावयास मिळत असून, पालकमंत्री यशोमती ठाकूर व खा. नवनीत राणा यांनी डीएफओ विनोद शिवकुमार याच्यासह वरिष्ठ अधिकारी रेड्डी याच्यावरदेखील कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- त्याला फाशी द्या, नाहीतर मलातरी फाशी द्या
दीपाली चव्हाण यांची आई शकुंतलाबाई चव्हाण यांनी डीएफओ विनोद शिवकुमार याला तत्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली आहे. त्याला फाशी देत नसाल तर मला तरी फाशी द्या. जोपर्यंत शिवकुमार आणि वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलीचे प्रेत ताब्यात घेणार नसल्याचे शकुतलाबाई यांनी स्पष्ट केले असून, माझ्या मुलीच्या आत्महत्येस वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी धारणी येथील पीएसआय तांबे यांनी अशाचप्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे शासकीय खात्यामध्ये काम करणार्या वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्या दबावाखाली अनेक अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे.
- शिवकुमार निलंबित, श्रीनिवास रेड्डी सहआरोप ी
दीपाली चव्हाण यांच्या आई शकुंतला बाई चव्हाण यांनी मुलीचा मृतदेह घेण्यास नकार दिल्यामुळे प्रकरण पुन्हा चिघळले होते. दरम्यान, आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार याला शासकीय सेवेतून निलंबित केल्याची माहिती असून, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. दीपालीच्या पार्थिवावर मोरगाव, ता. नांदगाव, जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार होणार आहे.