नवी दिल्ली : देशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. १ मार्चपासून ६0 पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणार्या ४५ हून अधिक वय असणार्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार, असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. १0 हजार सरकारी आणि २0 हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसेच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार, असल्याचेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.
प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं की, ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालयं आणि लसनिर्मिती करणार्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. दरम्यान कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथकं पाठवण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रासहित केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही पथकं पाठवण्यात आली असून कोरोनाशी लढण्यात मदत करणं हा मुख्य हेतू आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या पथकांचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव-स्तरीय अधिकारी करणार आहेत.
Related Stories
October 10, 2024