अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात 141 नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छूक संस्था व गटांनी 3 नोव्हेंबरपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले आहे. मेळघाटातील 39 गावांचा त्यात समावेश आहे. अर्जविक्रीची प्रक्रिया सोमवारपासून (18 ऑक्टोबरपासून) तहसील कार्यालयात सुरू होणार आहे.
ग्रामीण क्षेत्रात रास्त भाव दुकाने मंजूर करताना प्राथम्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था व संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास असा प्राथम्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे होणे आवश्यक आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे या दुकानांचा जाहीरनामा व क्षेत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.