अमरावती : जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येने उचल घेतली असून, एकाच दिवसात तब्बल ९0६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. परिणामी, जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ८३१ कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. आज पुन्हा ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४८७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. २७ हजार ७६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. ५ हजारपेक्षा जास्त रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून, दुपारनंतर संपूर्ण शहर हे निर्मनुष्य होत असल्याचे भयावह चित्र अमरावती जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ पाहता जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे तसेच सावधगिरी बाळगण्याचे अवाहन करण्यात आले आहे. वास्तविक परिस्थिती पाहता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे यासारख्या नियमांचा नागरिकांना जणू विसर पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. बाजारपेठ, शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय, समारंभ, वा इतर ठिकाणी वावरत असताना नागरिक हे बिनधास्तपणे वावरत असून, कोरोना हा विषयच संपल्यासारखे वागत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये निर्माण झालेली बिनधास्त वागण्याची प्रवृत्ती आणि नियमांचे पालन न करण्याची सवय यामुळे जिल्ह्यात नव्याने कोरोना संक्रमणाची लाट तयार झाली असून, याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका हा नियम पाळणार्यांना देखिल बसत आहे. प्रशासनाने आता प्रत्येकच ठिकाणी कडक निर्बंध लागू केले असून, या नियमाचे उल्लंघन करणार्यांना पोलिसांकडून देखिल चांगलाच चोप दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा अन्यथा, लॉकडाऊनला सामोरे जा असा इशाराच शासनाने दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊनची नेमकी परीस्थिती स्पष्ट होणार असून, राज्य शासन या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्ह्यात ९0६ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले असून, ३२ हजार ८३१ रुग्ण हे आतापर्यंत कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ४८७ रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून, ५00 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Related Stories
October 14, 2024