अमरावती : जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम राणे हे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तनिमित्त कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधिक्षक हरीबालाजी. एन यांनी वृक्ष रोपटे,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
श्री. राणे हे अमरावती ग्रामीण येथे पोलीस शिपाई या पदावर दि. १ एप्रिल १९८३ रोजी भरती झाले. डिजिटल मायक्रो फोटोग्राफी व चान्सप्रिट फोटोग्राफी बाबतचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची आयकार युनिटमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या ३८ वर्षाच्या अखंड सेवेमध्ये पोलीस विभागात छायाचित्रण व इतर महत्वाची कामगिरी केली. त्यांनी घेतलेल्या बोटांच्या ठश्यांचे छायाचित्रणामुळे अनेक गुन्हे उघडकीस आले. श्री राणे यांना सन २०१५ या वर्षाकरिता महाराष्ट्र दिनाच्या वर्धापनदिनी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे – पाटील यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक,स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला होता.
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सेवा बजावली आहे. श्री. राणे हे कार्यतत्पर, प्रेमळ व प्रामाणिक सहकारी असून अनेक महत्वाच्या व तातडीच्या कामांसाठी त्यांनी मोलाची सेवा दिली आहे अशी भावना यावेळी कार्यालयातील विविध सहका-यांनी व्यक्त केली.
त्यांच्या निरोप सत्कार समारंभ कार्यक्रमात पोलीस अधिक्षक कार्यालयातील,स्थानिक गुन्हे शाखा तसेच आयकार युनिट चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.