निरोगी जीवनासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे, हे आपण जाणतो. दररोज किमान सात ते आठ तास शांत झोप घ्यायला हवी. मात्र कामाचा ताण किंवा अन्य कारणांमुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं. उगाचच जागरण केलं जातं. परिणामी विविध व्याधी जडण्याची शक्यता वाढते.
झोपेचंही एक विज्ञान आहे. अपुर्या झोपेमुळे वजन वाढू शकतं. अपुरी झोप स्थूलपणा, हृदयविकार तसंच नैराश्याला कारणीभूत ठरू शकते. १८ ते ६0 या वयोगटातील लोकांनी दररोज किमान सात तास झोप घ्यायला हवी. रात्री पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतल्यास अशा पाच रात्रींमध्ये सरासरी ८0 ग्रॅम वजन वाढतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसार झोप आणि वजन यांचा थेट संबंध असतो. अपुर्या झोपेमुळे स्थूलपणा तसंच वजन वाढण्याचा धोका मोठय़ा प्रमाणावर वाढतो. इतकंच नाही तर अपुर्या झोपेमुळे उच्च कॅलरीयुक्त आहार घेण्याचं प्रमाण वाढू शकतं. झोप कमी झाल्यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवणार्या घ्रेलन आणि लेप्टन या हार्मोन्सचं असंतुलन निर्माण होऊन अतिखाणं होतं. याचा परिणाम अर्थातच वजनावर होऊ लागतो. घ्रेलनची निर्मिती वेगाने होऊ लागल्याने भूक वाढते.
अपुर्या झोपेचा कार्टिसोल नामक स्ट्रेस हार्मोनवर परिणाम होऊ लागतो. अपुर्या झोपेमुळे शरीराला ताण आल्यासारखं वाटतं आणि कार्टिसोल निर्मितीचा वेग वाढतो. या हार्मोनमुळे गोड, चटपटीत, तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. झोपेच्या काळात शरीर विश्रांती घेत असतं. या काळात शरीराची झालेली झीज भरून निघत असते. वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची निर्मिती होत असते. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. मात्र अपुर्या झोपेमुळे हे शक्य होत नाही. कमी झोपेमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढून मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.
Related Stories
September 3, 2024