मुंबई : मार्च, २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या ३७ हजार २२७ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी केंद्र व राज्य शासनाकडून ५०-५० या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत सन २०२४ पर्यंत जल जीवन मिशन कार्यक्रमासाठी एकूण रु. ३७,२२७.५० कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. या अंतर्गत राज्यात ३७,९९३ नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून त्यानुसार ग्रामीण भागातील एकूण १,४६,०८,५३२ कुटूंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी या कार्यक्रमाचा रु.१५,६३३.५० कोटी खर्चाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण २७,३६,७७५ इतक्या कुटूंबांना नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित १५,१९,१७९ कुटूंबांना सन २०२३-२४ मध्ये नळ जोडण्या देण्यात येणार आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १,०४,१६,८६८ इतक्या नळजोडण्या देण्यात आल्या आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.