वाशीम : पूजा चव्हाण प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मौन सोडून पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. राठोड म्हणाले, ‘पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दु:ख आहे. तिच्या कुटुंबीयाच्या दु:खात मी आणि समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांनी जे दाखवले, त्यात कोणतेही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस तपास करीत आहेत. पण, माझी आणि समाजाबद्दल घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल ते बघा, असं म्हणत संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पूजा चव्हाण प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मौन धारण करीत सार्वजनिक जीवनापासून अलिप्त झाले होते. १५ दिवसांनंतर राठोड अखेर मंगळवारी जनतेच्या नजरेसमोर आले. संजय राठोड यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.आज त्यांनी पोहरादेवी येथे सहकुटुंब जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सेवालाल महाराजांचेही दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले.
राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम
पूजा चव्हाण या तरुणीच्या प्रकरणावरून भाजपाकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राठोड यांनी राजीनामा देणार नसल्याचेच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. ‘गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी चार वेळा निवडून आलो आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. ३0 वर्षांपासून काम करतोय. दहा दिवसांपासून अलिप्त होतो. या काळात मी माझे आईवडील, माझी पत्नी आणि मुलांना सांभाळण्याचे काम करीत होतो. तसेच शासकीय कामसुद्धा मुंबईतील फ्लॅटवरून सुरू होते. माझे काम थांबलेले नव्हते. आज इथे दर्शन घेऊन पुन्हा एकदा कामाला सुरूवात करणार आहे,’ असे सांगत राठोड यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा देणार नसल्याचंच स्पष्ट केले.
सर्मथकांचे पोहरादेवीत शक्तिप्रदर्शन
वनमंत्री ना. संजय राठोड हे गेल्या काही दिवसांपासून सामान्य जनतेपासून चार हात लांब होते. मंगळवारी ते पोहरादेवी येथे येणार असल्याने त्यांच्या हजारो सर्मथकांनी शक्तिप्रदर्शन केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले नव्हते. मंगळवार, २३ फेब्रुवारी ते पोहरादेवीत येणार असल्याने त्यांचे हजारो सर्मथक ते येण्याअगोदर पोहरादेवीत दाखल झाले. कोरोनाच वाढत्या संसर्गामुळे पोहरादेवीत ५0 पेक्षाजास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसल्याने ना. राठोडांचे सर्मथक पोहरादेवीच्या शेतशिवारात थांबून त्यांची प्रतीक्षा करीत होते. अनेक सर्मथकांनी ना. राठोड यांचे बॅनर झळकवून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
Related Stories
October 14, 2024