नांदगाव पेठ : चंद्रपूर येथे गुन्हे शाखेत कार्यरत असणारे येथील सुपूत्र संदीप कापडे यांनी एका आंतरराज्यीय चोरी करणार्या टोळीचा पदार्फाश केला.अगदी सिने स्टाईल पद्धतीने संदीप कापडे व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून या घटनेतील म्होरक्याला उत्तर प्रदेशातील ककराला येथून ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून तीन किलो सोने व अन्य मुद्देमाल जप्त करून आरोपींना कोठडीत रवाना केले. राज्यातील इतर भागात बँक, एटीएम फोडून सोने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी पोलिसांसाठी आव्हान ठरली होती. मात्र चंद्रपूर पोलिसांनी ते शक्य करून दाखवत आज राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी बँक फोडून त्यातील सात लाख रुपये रोख व ९३ ग्राम सोने लंपास केले होते. त्याअनुषंगाने चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो.नी. जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे आदींनी पंचनाम्यादरम्यान बारकाईने निरीक्षण केले. दरम्यान, त्या एका महिन्यात अश्याच चोरीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या त्याची तपशीलवार माहिती घेऊन व त्याचा अभ्यास करून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स. पो. नि. जितेंद्र बोबडे व पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी अभियान हातात घेऊन मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधारे . चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला नवाबुल हसन व त्याचा साथीदार दानविरसिंग एका ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल वार केल्यानंतर पोलिस व आरोपी यांच्यामध्ये चांगलीच झटापट झाली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे व सपोनि जितेंद्र बोबडे दोघेही जखमी झाले. जखमी अवस्थेत देखील आरोपींचा प्रतिकार करून त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून तीन किलो सोने, आरोपींचे वाहन, अन्य साहित्य असे एकूण एक कोटी एक लाख दहा हजार रुपयांचा माल जप्त केला. आरोपींना मुद्देमालासह चंद्रपूर येथे आणले व दोघांचीही कोठडीत रवानगी केली. राज्यभर सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणाचे ककराला हे माहेरघर असून, चंद्रपूर पोलिसांनी संपूर्ण अड्डाच उद्धवस्त केला. चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या कार्य वाहीमुळे राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Related Stories
October 14, 2024