यवतमाळ : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीवर चाकुने वार व गळा आवळून ठार मारल्याची घटना बुधवारी सकाळी येथील शिवाजी नगरातील गार्डनजवळ घडली. सकाळी-सकाळी शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या थरारक घटनेने खळबळ उडाली असून, अवधूतवाडी पोलिसांनी आरोपी पतीला काही तासातच ताब्यात घेऊन अटक केली. रविराज रमेश चौधरी, रा. पिंपळगाव, ता. पुसद असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी रविराज (वय ३५) हा शिवाजी नगरातील उमेश आनंदराव ठाकरे यांच्या घरी राहत होता. घटनेच्या दोन दिवस अगोदर पत्नी मेघना हिच्यासोबत तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून रविराजचे भांडण झाले होते. हा वाद दोन दिवसांपासून सुरूच होता. यावरून त्यांचे सतत खटके उडत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री रविराजने पत्नी मेघनाला मारहाण केली. त्यानंतर रविराजने घरातील चाकूने मेघनाच्या शरीरावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. ती मरण पावली नसल्याचे पाहून निर्दयी पतीने तिचा गळा आवळून खून केला. सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. घरमालक उमेश ठाकरे यास रविराजने या घटनेबाबत माहिती दिली. उमेश ठाकरे यांनी याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी शिवाजी नगरातील रविराज राहत असलेल्या ठिकाणी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी रविराजला ताब्यात घेऊन मृतक मेघनाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. रविराज व मेघना हे पुसद येथील रहिवासी असल्याने तेथेही याबाबतची माहिती कळविण्यात आली. रविराज व मेघनाला पाच वर्षाचा मुलगा असून, आईच्या मृत्यूने तो मात्र पोरका झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी रविराजविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Related Stories
October 10, 2024