- * जिल्हाधिका-यांकडून कोयलारी, पाचडोंगरीला भेट
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने घरोघरी तपासण्या व सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी येथील दूषित पाणी बाधा प्रकरणी जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पाचडोंगरी, कोयलारी येथील गावांसह काटकुंभ व चुरणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही जिल्हाधिका-यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्ण, त्यांचे कुटुंबिय, नागरिक यांच्याशीही संवाद साधला व परिस्थितीची माहिती घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, प्र. तहसीलदार गजाजन राजगडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती कौर म्हणाल्या की, आरोग्य विभागाने सतर्क राहून कामे करावीत. रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत. औषधसाठा पुरेसा ठेवा. नागरिकांच्या सुविधांसाठी बायोटॉयलेट व जनरेटरची व्यवस्था तत्काळ करावी. एकही दिवस वीज खंडित होता कामा नये. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा. आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढवावी. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांशीही संपर्क ठेवून त्यांची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.चुरणी येथे एक आयसोलेशन सेंटर वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याठिकाणी 50 खाटा उपलब्ध असाव्यात. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.