* ‘आयटीआय’मधील ‘फॅशन शो’ दिला विद्यार्थींनीना आत्मविश्वास
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील कष्टकरी समाजातील मुलींनी आज रॅम्पवर दमदार पाऊल टाकले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागातर्फे ‘आयटीआय’मध्ये आयोजित केलेल्या ‘फॅशन शो’ने मुलींमध्ये आत्मविश्वास जागविला. ‘आयटीआय’मध्ये विविध ट्रेडसचे शिक्षण घेणा-या या मुलींनी अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे अमरावती विभागातील आयटीआयमधील मुलींसाठी ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. जिल्हा औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. सहायक संचालक नरेंद्र येते, प्राचार्य मंगलाताई देशमुख, उपप्राचार्य राजेश चुलेट, विभागीय समन्वयक व्ही. आर. त्रिपाठी, मनीषा गुढे, प्रा. रवींद्र दांडगे उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ. यशश्री चव्हाण, श्रुती आगलावे, प्रेरणा नानवाणी व प्रफुल्ल कुयटे यांनी काम पाहिले.
विभागातील पाचही जिल्ह्यातील सुमारे 40 विद्यार्थिनींनी सादरीकरणात सहभाग घेतला. मेकअप, स्युईंग, कॉस्च्युम याबरोबरच पारंपरिक मशिनिस्ट, टर्नर, वायरमन, मेकॅनिक, वेल्डर अशा विविध ट्रेडचे शिक्षण घेणा-या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने सादरीकरण केले. अमरावतीत ‘फॅशन शो’ची संकल्पना अभिवन पद्धतीने राबविण्यात आली. कारखान्यांमध्ये पुरूषांच्या बरोबरीने कष्ट करणा-या वेल्डर, मेकॅनिक, मशिनिस्ट यांच्या वेशभूषेतही काही विद्यार्थीनींनी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. पारंपरिक, तसेच नाविन्यपूर्ण वेशभूषेतील सादरीकरणाचा उत्तम आविष्कार विद्यार्थीनींनी घडवला व परीक्षकांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली.
स्पर्धेतून राज्यस्तरावरील सादरीकरणासाठी अमरावती येथील महिमा पिसोळे, प्रीती मोरे, नांदुरा (बुलडाणा) येथील भारती सोळंके, मोझरी येथील ज्ञानेश्वरी फुके, मूर्तिजापूर (अकोला) येथील दर्शना मसने, दारव्हा (यवतमाळ) येथील रेश्मा राठोड, दिग्रस (यवतमाळ) येथील स्नेहल पवार यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कावेरी म्हस्के व प्रा. सुरेंद्र भोंडे यांनी केले.