- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : वाचन संस्कृती वृध्दिंगत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर अमरावती शासकीय विभागीय ग्रंथालय येथे नुकतेच ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रंथदिंडीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, विविध विषयांवर परिसंवाद, एकपात्री प्रयोग तसेच कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या विविधरंगी कार्यक्रमांना वाचक, लेखक, ग्रंथप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ या उक्तीनुसार कवी संमेलनामध्ये कवींनी बहारदार काव्य सादर केले. प्रतिभाशाली काव्यातून कवि संमेलनाची मैफल रंगली. करुण, वीर, हास्य अशा नऊही रसांनीयुक्त कवितांचे सादरीकरण करुन कवींनी त्यांच्या भावना उलगडल्यात. कवी संमेलनाचे अध्यक्ष राज यावलीकर यांनी वऱ्हाडी थाटात कविता सादर केल्या. ग्रामीण जीवनाचे हुबेहुब वर्णन त्यांनी काव्यातून मांडले. विष्णू सोळंके यांनी देशभक्तीपर रोमहर्षक गीत सादर केले. अनंत नांदूरकर यांचे मराठीसह हिंदी आणि ऊर्दू भाषेतून बहारदार गजल सादर केल्या. संघमित्रा खंडारे यांनी ‘माऊली’ या विषयावर काव्य सादर केले. भगवान फाळके, प्रा. ज्ञानेश्वर गटकर, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता सादर केल्या. कवी संमेलनाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द निवेदक पवन नालट यांनी केले.
- समाज माध्यमे आणि साहित्य : परिसंवाद
ग्रंथोत्सवात आयोजित ‘समाज माध्यमे आणि साहित्य’ या परिसंवादात तपोवन संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी मार्गदर्शन केले. आज सर्वत्र समाज माध्यमांव्दारे माहितीचा ओघ सातत्त्याने वाहत आहे. या माहितीच्या प्रवाहात वाहून न जाता यातील नेमके काय घ्यावे, याची समज असायला हवी. प्रत्येक काळातील साहित्य हा त्या समाजाचा आरसा असतो. साहित्याचा प्रसार करण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रसिध्द चित्रकार सुनील यावलीकर, प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी समाज माध्यमांच्या काळातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
वाङ्मय चर्चा, विविध विषयावर परिसंवाद, एकपात्री प्रयोग, पुस्तक प्रदर्शन व विक्री, मुलाखत आणि काव्य मैफल या भरगच्च कार्यक्रमाने ग्रंथोत्सव उत्साहात साजरा झाला. विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, अविनाश दुधे, प्रा. हेमंत खडके आदी यावेळी उपस्थित होते.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–