गुढीपाडवा हा हिंदूचा सण. अनादीकाळापासून हिंदू लोकं गुढीपाडवा साजरा करीत असायचे. ते या दिवशी तोरणे, पताका लावून व गुढी उभारुन हा सण साजरा करायचे. त्यातच गुढी उभारतांना मंदिरातील कलशाप्रमाणे तो कलश उपडा ठेवायचे. त्याचं वैज्ञानीक कारणही होतं. ते म्हणजे आकाशातून आलेली सकारात्मक उर्जा खिचून ती उर्जा जमीनीवर पोहोचविणे. याचाच अर्थ असा की या जमीनीवर राहणा-या जीवजंतूंना या उर्जेचा फायदा होईल. कलश यासाठी वापरला जाई. कारण तो तांब्याचा होता व तांबा हा धातू उर्जेचा जास्त प्रमाणात वाहक आहे. त्यातच ही प्रक्रिया लाभदायी असल्यानं गुढी उभारण्याची प्रथा मोठ्या हिरीरीनं सुरु होती.
मुघल जेव्हा सातव्या शतकात मोहम्मद बिन कासीमच्या रुपानं भारतात आले. तेव्हापासूनच ते भारतीय लोकांचा राग करायचे. कारण श्रीलंकेतून सिंधच्या देबल बंदरामार्गे इराकला जाणारं जहाज भारताच्या देबल बंदराजवळ अज्ञात लुटारुंनी लुटलं. ज्यात अतिशय मौल्यवान खजिना होता आणि जो इराकच्या खलिफाला बक्षीस म्हणून जात होता. तो खजिना देबलच्या बंदरात लुटला गेला. तो कोणी लुटला हे खलिफालाही वा कोणालाही माहित नव्हतं. परंतू त्याचं पाप देबल बंदरात ज्या राजाची सत्ता होती. अर्थात देबल बंदर ज्यांच्या ताब्यात होतं. त्या राजा दाहिरवर लावण्यात आलं. राजा दाहिर जो एक हिंदू राजा होता. याचाच अर्थ असा की त्यात एकट्या राजा दाहिरला दोषी न ठरवता संपूर्ण हिंदू धर्मालाच दोषी ठरविण्यात आलं. कारण राजा दाहिर हा हिंदू धर्माचा पुरस्कर्ताही होता.
महाराजा संभाजीला गुढीपाडव्याच्या दोन दिवसापुर्वी मारुन दुस-या दिवशी त्यांचं मस्तक भाल्यावर चढवून वाजत गाजत त्या मस्तकाची मिळवणूक मुघलांनी काढली आणि त्यातच त्यांच्या देहाचे तुकडे करुन ज्या वढू गावाच्या कारागृहात त्यांना बंदीस्त केलं होतं. त्याच गावच्या भीमा, भामा व इंद्रायणी संगमावर म्हणजेच वढेश्वराच्या बाजूलाच त्यांच्या देहाचे तुकडे नदीपात्रात टाकण्यात आले. जेणेकरुन त्या तुकड्यांना ओळखता येवू नये व त्यांचं मांस मासोळ्यांनी वा कोल्ह्याकुत्र्यांनी खावं. त्यांच्यासोबतच कवी कलशांचेही तुकडे करुन टाकण्यात आले होते. आणि फर्मान जाहिर करण्यात आले होते की उद्या कोणीही या तुकड्यांना अग्नी देवू नये. त्यातच कोणीही गुढीपाडवा साजरा करु नये. त्याचं पुर्वसंध्येला मारुन त्यांचं मस्तक भाल्यावर चढविण्याचा अर्थ असाच निघत होता. तरीही लोकांनी गुढीपाडवा साजरा केला व संभाजी आणि कवी कलशांच्या तुकड्यांना अग्नीही दिला.
गुढीपाडवा हा हिंदूचा सण असून त्याला गालबोट मुघलांनी लावण्याचा प्रयत्न केला. एवढच नाही तर या तमाम महाराष्ट्रातूनच नाही तर देशातूनही समुळ हिंदू धर्माचं उच्चाटन कसं करता येईल याचा विचार स्वार्थी व धुर्त औरंगजेबानं केला. परंतू त्याला त्यात यश आले नाही.
गुढीपाडवा हा हिंदूचा सण जरी असला तरी तो इतरही धर्मीयांनी मानायला हवा. कारण याच दिवशी ख-या अर्थानं नवीन वर्षाची सुरुवात होते. शिशिर ऋतू जावून वसंताला सुरुवात होते.,झाडांना नवी पालवी फुटलेली असते. त्यामुळं साहजिकच या पालवीतून मनमोहक असा सुगंध दरवळत असतो. ज्या सुगंधानं अगदी मन प्रसन्न होवून जाते. या दिवशी चैत्र मासाला आरंभ होत असून शेतकरी आपल्या शेतात साजवणी करीत असतात. साजवणी याचा अर्थ असा की या दिवशीपासून शेतकरी नवीन वर्षातील शेतीच्या कामाची सुरुवात करीत असतात. साजवणी करतांना गुळ आणि पोळीचा नैवेद्य वखरावर ठेवतात. बैलांना गुळपोळी चारतात. ज्यूची व वखराची हळद कुंकू लावून पुजा करतात. तसेच इतर माणसांनाही गुळपोळी देतात. काही लोकं पुर्वी भजन किर्तनही करायचे या दिवशी. आता मात्र ती प्रथा काही ठिकाणी दिसते तर काही ठिकाणी दिसत नाही. याच दिवशी कोणी मोठी माणसे, ज्यांच्याकडे भरमसाट शेती आहे. ती मंडळी सालदार ठेवतात. सालदार याचा अर्थ गडी माणूस. जो गडी माणूस शेतात वर्षभरासाठी नोकर असतो. बदल्यात तो धान्य आणि पैसा घेतो. पुर्वी मात्र धान्य घ्यायचा. आता मात्र तसं नाही. आता हा सालदार रोख पैसाच घेत असतो. काही लोकं या दिवसापासून हिशोबाच्या वह्या बदलवितात. तसेच हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.
गुढीपाडव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असून अशा या हिंदू सणाला औरंगजेबानं गालबोट जरी लावण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचं महत्व हिंदूनी कमी होवू दिलं नाही. ज्यावेळी संभाजी राजांचा मृत्यू झाला, त्यावेळीही हिंदूंनी ह्या सणाच्या दिवशी शोक व्यक्त केला नाही. कारण या सणाच्या दिवशी शोक व्यक्त करणे म्हणजे मुघलांची कुठेतरी जीत होती. ती जीत हिंदूंना होवू द्यायची नव्हती.
महत्वाचं म्हणजे या दिवसाच्या दोन दिवस पुर्वी धर्मासाठी बलिदान देणारा धर्मवीर संभाजी राजांचा मृत्यू झाला असला किंवा त्यांना मुघल बादशाहा औरंगजेबानं तडपवून मारलं असलं आणि तमाम हिंदूच्या भावना दुखावल्या असल्या तरी आजही आम्ही गुढीपाडवा साजरा करतो. कारण त्या गुढीपाडवा साजरा करण्यामागे आमचे तीन उद्देश आहेत. एक म्हणजे गुढीपाडवा सण साजरा करणे. दोन म्हणजे महाराज संभाजींना त्या निमित्यानं श्रद्धांजली अर्पण करणे व तिसरा हेतू म्हणजे औरंगजेबाच्या आत्म्याला व त्याच्या वंशजांना चपराक देणे. आम्ही आता डौलानं गुढीपाडवा साजरा करु. जो आमच्या लाडक्या राजांचा विरगती दिवस आहे. तसेच हा दिवस साजरा करणे याचा अर्थ महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणे होय.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५