अमरावती, दि. 26 : संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. धर्मनिरपेक्षता व संविधानाने दिलेल्या विविध मूल्यांच्या संरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन करत, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधव, महिला, वंचित, गरीब व गरजूंच्या हितासाठी विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्धार आज व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापनदिनोत्सवात जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर त्यांनी गत वर्षातील घटना, विकास प्रक्रियेचा आढावा घेत जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित केले. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, पोलीस महानिरीक्षक संजयकुमार मीना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारीने वर्षभरात उद्भवलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी झालेले प्रयत्न व शेतकरी, महिला, गरीब, गरजू, वंचितांसाठी शासनाने घेतलेले निर्णय, अंमलबजावणी यांचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी आपल्या चिंतनशील भाषणातून भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी एकजुटीचे आवाहन केले.त्या म्हणाल्या की, गेल्या वर्षभराचा कालखंड खूप काही शिकवणारा होता. अनेक अडचणी उभ्या राहिल्या. अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागल्या. आता लस उपलब्ध झाल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. या काळात अत्यंत कमी वेळेत जिल्हा कोविड रुग्णालय, तालुका कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर, तसेच विद्यापीठ व पीडीएमसी येथे लॅब उभी राहिली. अमरावती हे मध्यभारतातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा असणारे महत्वाचे केंद्र होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही लवकरच आकारास येणार आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाला व कोरोना साथीच्या काळात ही योजना गरीब व गरजू जनतेसाठी अधिक उपयुक्त ठरली. साथ लक्षात घेऊन त्याचे दरही पाच रूपयांपर्यंत कमी करण्यात आले. हजारो गरजूंनी त्याचा लाभ घेतला. कोरोनाच्या संकटाशी लढत असताना या काळात विकासाचे चक्र थांबू दिले नाही. उद्योगवाढीसाठीही प्रयत्न झाले. त्यानुसार ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत अमरावतीत दोन नवे उद्योग उभारले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीकेंद्रित विकासावर महाविकास आघाडी शासनाने भर दिला आहे. त्यासाठी सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाऊल उचलले. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली. शेतकरी ते थेट ग्राहक योजना, जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, कृषी संजीवन सप्ताह असे नवनवे उपक्रम राबविले गेले. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून शेतकरी गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात 244 विक्री केंद्रे सुरू करण्यात आली. शेतकरी बांधवांना बांधावर खतपुरवठा करण्यात आला. पावसाने नुकसानीच्या अनुषंगाने 3 लाख 67 हजार 916 शेतक-यांना सुमारे 337 कोटी रुपये मदतीचे वाटप होत आहे. ‘पोकरा’ अंतर्गत सहा हजारांहून अधिक शेतक-यांना सुमारे 12 कोटी रूपये अनुदान देण्यात आले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातही पाचशेहून अधिक अर्ज प्राप्त असून, अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येईल.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 6 हजारहून अधिक शेतक-यांना ठिबक व तुषार सिंचन संचाचा लाभ मिळाला. अमरावती व चांदूर बाजार तालुक्यात बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्रांसाठी 1 कोटी 20 लाखांचे अर्थसाह्य देण्यात आले. कोविड काळात अंगणवाड्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे बालकांना घरपोच आहार पुरवठा करण्यात आला. राज्यात पोषण आहार लाभार्थ्यांची संख्या 75 लाखांवर नेण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
‘मनरेगा’तून रोजगारनिर्मितीत महाराष्ट्रात अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर होता व आजही आहे. रोजगारनिर्मिती एवढेच उद्दिष्ट न ठेवता ग्रामसमृद्धीकडे पाऊल टाकत आहोत. अंगणवाडी, शाळा, पाणलोट क्षेत्रे आदींच्या विकासासाठी ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात त्याचा पथदर्शी प्रकल्प सुरु आहे. त्यासाठी ‘मनरेगा’चे उद्दिष्ट 218 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. यंदा त्यासाठी 4 हजार 393 कोटी 33 लाख रुपये निधीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून 20 कोटी 41 लक्ष मनुष्यदिन एवढी रोजगारनिर्मिती होईल. या मोहिमेत नागरिकांनी कृतीशील सहभागाचे आवाहन त्यांनी केले.
Related Stories
October 9, 2024