- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगार योजनांची माहिती ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना व्हावी यासाठी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन गुरूवारी (15 सप्टेंबर) अंजनगाव सुर्जी येथे करण्यात आले आहे.
अंजनगाव सुर्जी येथील अकोट रस्त्यावरील विठ्ठल मंदिर परिसरात सकाळी 11.30 वाजता मेळाव्याचे उद्घाटन होईल. मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या मध केंद्र योजनेचा माध्यमातुन मोफत प्रशिक्षण व 50 टक्के अनुदानावर मधपेटी, मध यंत्र व इतर पूरक साहित्य वाटप मध केंद्र योजनेमार्फत वितरीत करण्यात येते. तसेच पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत ग्रामीण व शहरी उद्योजकांना बँकांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये अनुदान शासनामार्फत देण्यात येते. तरी सर्व सुशिक्षित युवक व युवती, महिला बचत गट यांनी जनजागृती मेळाव्यास उपस्थित राहून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामद्योग अधिकारी प्रदिप दे.चेचरे यांनी केले आहे.