- बाप बोलता बोलता
- गेला नयन मिटून ।
- तुझ्या चेहऱ्याला वेड्या
- डोळ्यामध्ये साठवून ।।
- किती निर्लज्ज झालास
- किती झाला अपराधी ।
- तुझ्या बोलण्यामुळेच
- त्याला लागली समाधी ।।
- ओरडत गेला त्याला
- किती केली शिवीगाळ ।
- कसा पावणार देव?
- करुनिया जपमाळ ।।
- कोण बापाविना सांग
- तुझे लाड पुरविले? ।
- रानोवनी भटकून
- कोण तुला जगविले? ।।
- घाम गाळला बापाने
- तुझ्या सुखासाठी सदा ।
- तुला प्रिया बापापेक्षा
- आहे संपत्ती संपदा ।।
- किडे पडतील बघ
- तुझ्या तोंडात नक्कीच ।
- तुलासुद्धा बोलतील
- अरे लेकरे तुझीच ।।
- शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७