मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसत आहेत. या वरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. काही मोजके वगळता इथे कुणी मास्क वापरत नाहीत, मी बोलतानाही मास्क घालतो, पण काही जणांना मास्कमध्ये बोलताना अडचण होते, पण बोलून झाल्यानंतर तरी मास्क घाला असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले. मास्क न वापरणार्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे, अशी मागणीदेखील अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
देशात कोरोनाच्या संकटावर पंतप्रधान मोदीही गांभीर्याने विचार करत आहेत. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. पण इथे सभागृहात काही ठरावीक सोडले तर काही जण मास्क अजिबात वापरत नाहीत, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.परदेशात कोरोनाच्या नव्या विषाणूची वाईट परिस्थिती आहे. परदेशात रुग्ण दुप्पट होत आहेत, डब्ल्यूएचओनेही चिंता व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. हे झाले परदेशाचे आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे काय, काही गोष्टी त्या वेळीच गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. कुणी जर मास्क लावला नसेल तर बाहेर काढा, मी मास्क घातला नसेल तर मलाही बाहेर काढा, कृपा करुन ही गोष्ट लक्षात घ्या अशी विनंती अजित पवार यांनी केली.
ओमिक्रॉनचा धोका वाढत असला तरी लोक याबद्दल फारसे गंभीर नाहीत. ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ओमायक्रॉन विषाणू डेल्टापेक्षा तिप्पट पटीने संसर्गजन्य असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. राज्यांनी परिस्थिती पाहून नाईट कफ्यरू आणि कंटेनमेंट झोन तयार करणे यासारख्या आवश्यक उपाययोजनांसाठी सतर्क राहावे, असे निर्देश केंद्राने दिले आहेत.
गेल्या १८ दिवसांत ओमिक्रॉन बाधितांची संख्या शंभर पटीने वाढली आहे. केंद्र सरकारने राज्यांना ओमाक्रॉनसाठी वॉर रूम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत आहे. साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किंवा आयसीयू बेड ४0 टक्क्यांहून अधिक भरले असल्यास, जिल्हा किंवा स्थानिक स्तरावर नाईट कफ्यरू किंवा कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी त्वरित पावले उचलली जावीत असे केंद्र सरकारने म्हटले आहे.