राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या पाठपुराव्याची फलश्रुती…
अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांना एक फोन आला. तो फोन कोण्या कार्यकर्त्याचा, राजकीय क्षेत्रातला नव्हता. मात्र, त्या फोन वरील संभाषणातून बच्चू भाऊंना भरभरून आनंद झाला. कारण मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुराव्याची ती ‘फलश्रुती’ होती. भाऊंच्या मुंबई येथील शासकीय निवास्थानी कंत्राटी पद्धतीने मानधनावर काम करणाऱ्या नारायण या ‘अनाथ’ मुलाने भाऊंना फोन करीत एमपीएससी परीक्षेतून ‘वनक्षेत्रपाल’ (गट- ब ) पदावर नियुक्ती झाल्याचे त्याने बच्चूभाऊंना सांगितले.
नारायण इंगळे हा “अनाथ” आहे. नारायण मुळचा लातूरचा. तो लहानपणी पोलीसांना रेल्वे स्टेशनवर मिळाला होता. जालना येथील बाल न्यायालयाने त्याला रिमांडहोम मध्ये ठेवले. लातुरला बाल सुधारगृह येथे १ ते १० शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथे पॉलिटेक्निक शिक्षण पुर्ण केले व पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबादला समाजकल्याण होस्टेल मधून पुर्ण केले.
एमपीएससीचा अभ्यासाकरीता तो मागील २,३ वर्षापासून राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या शासकीय निवासस्थानी राहत होता व भाऊंच्या कार्यालयात कंत्राटी पध्दतीने मानधनावर काम करत होता. एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून हजारो मुलांची दरवर्षी निवड होत असते. परंतु नारायण यापेक्षा वेगळा होता. नारायण हा ‘अनाथ’ असल्याने परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये त्याला नेहमी संघर्ष करावा लागत होता. यामुळे नारायण सारख्या आज हजारो विद्यार्थ्यांना अशा समस्यांशी सामना करावा लागत होता. अनाथ मुलांच्या आरक्षणाकरीता बच्चूभाऊंकडून पाठपुरावा सुरू होता. अनाथांना आरक्षण जाहीर झाल्यानंतर नारायणाने परिक्षा दिली आणि तो उत्तीर्ण देखील झाला. परंतु एमपीएससीच्या पर्सेटाईल पध्दतीमुळे तो पास होऊन देखील अपात्र ठरला. त्यानंतर मागील वर्षापासून राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आयोगासोबत पत्रव्यवहार करीत बैठकी घेतल्या. परिणामी नियमात बदल झाल्याने अनाथ नारायणाला आपले स्वप्न साकार करता आले.
हे यश केवळ एकट्या नारायणचा नसुन महाराष्ट्रतील अनेक अनाथ मुलांचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला असून बच्चूभाऊंच्या पाठपुराव्यातून आता अनाथांनाही यशाचा मार्ग सुकर झाल्याचे समाधान अनाथ मुला-मुलींमध्ये असून राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूंच्या प्रयत्नांचे राज्यभर प्रशंसा होत आहे.