- * कार्यशाळेत दीडशे उद्योजकांचा सहभाग
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : उद्योग व उद्यमशीलता विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ अधिकाधिक उद्योजक, व्यावसायिकांना मिळावा. विभागातून अधिकाधिक निर्यातक्षम उद्योजक निर्माण व्हावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
उद्योग विभाग, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’(सिडबी) तर्फे अप्पर मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनात गुंतवणूक वृद्धी, निर्यात, व्यवसाय सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) आणि एक जिल्हा एक उत्पादन याबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा अभियंता भवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उद्योग सह संचालक गजेंद्र भारती, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, निर्यातदार उद्योजक संजय जाधव, प्रकाश अहीरराव, कृषी सह संचालक किसनराव मुळे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत दीडशेहून अधिक उद्योजक व नव उद्योजकांनी सहभाग घेतला. निर्यातीला चालना देणे, उद्योगांना एक खिडकी योजनेत परवानगी प्राप्त करुन देणे, एक जिल्हा एक उत्पादन आदी विविध योजनांबद्दल या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनीही मार्गदर्शन केले. निर्यात संधीचा विकास करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन मान्यवरांतर्फे करण्यात आले. श्री. जाधव, श्री. पातूरकर, श्री. अहिरराव, श्री. मुळे यांच्यासह विविध तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. श्री. भारती यांनी प्रास्ताविक केले. उद्योग निरीक्षक जी.बी. सांगळे यांनी आभार मानले. यानिमित्त अभियंता भवनात निर्यात होणाऱ्या व निर्यातक्षम वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते उद्या (29 सप्टेंबर ) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.