- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शासनाच्या निर्देशानुसार ई-श्रम पोर्टलवर जिल्ह्यातील अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी दि. 21 सप्टेंबरपर्यंत मोहिम राबविण्यात येत आहे. अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त प्र.रा. महाले यांनी दिली. बिडी कामगार, मच्छिमार कामगार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व सेवा पुरविण्यासाठी असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या आधारावर असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातील. असंघटित कामगारांची नागरी सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन नोंदणी होत आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी यासाठी दि. 21 सप्टेंबरपर्यंत मोहिम हाती घेण्यात आली आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय डेटाबेस अंतर्गत नोंदणीकृत कामगारांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे वार्षिक प्रिमियम बारा रूपये आहे.
- नोंदणीकरिता पात्रता
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 16 ते 59 दरम्यानचा कामगार, कामगार प्राप्तीकर भरणारा नसावा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. असंघटित कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.
- नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक किंवा आयएफएससी कोड असलेली इतर कोणतीही बँक ) सक्रिय मोबाईल नं. (ओटीपीकरिता स्वत:चा किंवा कुटंबातील अन्य व्यक्तीचा) स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगाराचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- नोंदणी कोठे करावी
नागरी सुविधा केंद्र (सीएससी), कामगार सुविधा केंद्र, ई-श्रम पोर्टल(eshram.gov.in), नॅशनल हेल्पलाईन नंबर- 14434, टोल फ्री नंबर- 18001374150.
ई-श्रम कार्ड योजना कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असून त्यामार्फत कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याद्वारे शासन कामगारांचा दोन लाख रूपयांपर्यंतचा विमा उतविणार आहे. कामगाराचा अपघातात मृत्यू, तसेच कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रूपये किंवा अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख रूपयाची आर्थिक मदत केंद्र शासनामार्फत कामगारांना मिळणार आहे. जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करून शासनाच्या ई-श्रम कार्ड योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!