लहानपणी जेव्हा शाळेत जायला लागले तेव्हा मलाच काय सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला जायचा की, आयुष्यात तुला किती मोठं व्हायचं आहे? म्हणजेच मोठं होऊन कोण बनायचं आहे तुला? तुझं स्वप्न काय आहे? प्रत्येक वर्गात असे प्रश्न नक्कीच विचारले जायचे.याचं उत्तर द्यायला देखील मज्जा यायची. आम्ही छोटे- छोटे असुनही मोठे- मोठे स्वप्न सांगायला भारी वाटायचं. माझं उत्तर एकचं असायचं ते म्हणजे समाजसेवा. माझ्या सोबत माझे अनेक मैत्रिणी त्यांचे स्वप्न मात्र वेगळी होती. काहींना IPS अधिकारी तर काहींना पोलिस तर आणखी काहींना शिक्षक आणि काहींना डॉक्टर , असे वेगवेगळे उत्तरे प्रत्येकाकडून यायचे.
प्रत्येक जण हेचं म्हणायचं की, मला माझं हे स्वप्न आहे आणि पूर्ण करायचं आहे. पण मी अजुन तरी कोणत्याचं विद्यार्थ्यांचं उत्तर हे नाही ऐकलं की, “मला मोठं होऊन आई वडिलांची सेवा करायची आहे.” परवाचं पाहिलेलं एक उदाहरण. रस्त्याने सहज जात होते. वाटेत एक आजोबा भेटले. तसे ते मोठ्या घरचे होते चेहेऱ्यावर सुरकुत्या पडलेले थोडं अंधुक अंधुक दिसत होतं त्यांना शिकलेले बहुधा नव्हते पण कसलेल्या जमिनीतले मात्र वाटत होते. त्यांना खूप थकवा आला होता आणि चक्कर येत होती त्यामुळे हाताला धरून खाली बसवलं. आणि सहज बोलत गेले.बोलता- बोलता पूर्ण ओळख निघत गेली. त्यांना दोन मुलं. मुलगी तर नव्हती पण दोन्ही मुलं भरपूर शिकलेली एक डॉक्टर होऊन मुंबई ला तर दुसरा इंजिनिअर होऊन पुण्याला होता.
मी सहज त्यांना विचारलं “आजोबा तुमचे दोन्ही मुलं इतकं शिकलेले आहेत इतक्या चांगल्या घरात आहेत मग तुम्ही इथे काय करता? तुम्हीही तिकडे जा ना! ऐशी आरामीचं जीवन जगा.” नकळत माझ्या बोलण्याने त्यांचे डोळे पाणावले. मी म्हटलं , “बोलण्याच्या नादात मी काही चुकीचं बोलले असेन तर क्षमा असावी आजोबा. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं.” तेंव्हा ते नकळत बोलुन गेले. ” नाही रे बाळा तू बोलली ते योग्य आहे तुझ्या जागी. पण आजकाल मुलांना आमची लाज वाटत आहे गं . इकडे वीस एक्कर शेती आहे.माझं आयुष्यचं त्यात गेलं. त्यामुळे मुलांचं आयुष्य त्यात जाऊ नये म्हणून त्यांना शहरात शिकायला घातली. आणि ते शिकुन इतके मोठे झाले की त्यांना शेतकरी बापाची लाज वाटू लागली आहे. दिवस रात्र कष्ट करून मी जे पैसे पाठवत होतो ते सगळं विसरले ते आता आम्हाला बोलायला देखील वेळ नाही त्यांच्याकडे.”
आजोबांचे ते बोलणे ऐकून मन चैन बीचैन झालं, आणि नकळत पाण्याने डोळे साचले. विचार केले त्या मुलांना शिकऊन काय उपयोग झालं. जे आपल्या जन्मदात्या आई वडिलांना विचारत नाहीत, त्यांच्या कष्टाचे मोल त्यांना कळत नाही. स्वत: फाटकं वस्त्र घालून त्यांना नवे कपडे घेणारे वडील त्यांना नाही दिसत, माझं लेकरु शिकायला बाहेरगावी आहे. तो कसा असेल या विचाराने त्या माऊलीला झोप लागत नव्हती. हे त्यांना कळलं नाही मग त्यांची डॉक्टर, इंजिनिअर ची डिग्री घेऊन तरी काय उपयोग. खरंच ते आयुष्यात मोठे झाले का?
डॉक्टर, इंजिनिअर ची डिग्री घेतले पण त्यामागचा त्यांच्या आईवडिलांचा संघर्ष मात्र त्यांना दिसला नाही. इतकंच कळालं त्यांना आता आपण आपल्या पायावर उभं राहिलो. पण त्यांच्या जीवनाचा पाया रचणाऱ्यांना मात्र ते विसरले.इतकं शिकुन त्यांचं काय उपयोग झालं मग. ते भलेही म्हणत असतील मी डॉक्टर झालो मी इंजिनिअर झालो. पण हे जग ज्यांच्या मुळे पहायला भेटलं त्यांनाचं विसरले तर ते खरंच आयुष्यात मोठे झाले का? आयुष्यात नक्कीच मोठे व्हा! पण किती? जन्मदात्या आईवडिलांनी म्हणायला पाहिजे की तुला जन्म दिलं याचं सार्थक झालं, शिक्षकांनी म्हणायला पाहिजे की तू आमचा विदयार्थी आहेस याचा अभिमान वाटतो, सोबत असलेल्या स्नेहीने म्हणायला पाहिजे की, तू मला सोबती म्हणून भेटलास भाग्य माझे.
आयुष्यात इतकेच मोठे व्हा! जेणेकरून प्रत्येकाच्या मुखी तुमचे नाव असेल तेही वाईट कर्मामुळे नाहीतर चांगल्या कर्मामुळे. वाटेने जर तुमचे वडील जात असतील तर ते त्यांच्या नावाने नाही तर तुमच्या नावाने ओळखले पाहिजे. दोन शब्द कमी शिकलं तरी चालेल पण आई-वडिलांच्या जगण्याचं कारण बना. बायकोचं बैल नाहीतर आईवडिलांचा श्रावणबाळ म्हणून स्वतःला घडवा. तुमच्या प्रत्येक कार्याने त्यांच्या चेहेऱ्यावर स्मित हास्य येऊ द्या. आई वडील आनंदी असतील तर जग जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्यात येईल. स्वतःचा स्वाभिमान स्वतः सांगाल.
म्हणून म्हणत आहे आयुष्यात मोठे व्हा! पण किती? तर आपल्यामुळे एखाद्यायला आनंद मिळेल. काहींच्या चेहेऱ्यावर स्मित हास्य येईल. काहींना तुमची मदत होईल त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदासाठी आटा पिटा करा नक्कीच तुमचं जीवन सार्थकी लागले आणि सर्वांसाठी एक आदर्श बनाल. ज्या दिवशी तुमच्या मुळे प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर स्मित हास्य असेल ना! त्या दिवशी तुमच्या इतका श्रीमंत कोणीच नसेल. म्हणुन आयुष्यात जास्ती नाही पण हे दिवस बघण्या इतकंच मोठे व्हा!
- कु : स्नेहा शिवाजी जाधव
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–