सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असणे, लोकहिताची तळमळ बाळगून कारभार करणे अर्थात ‘मुद्रा भद्राय राजते’ ची मुद्रा समस्त प्रजेला विश्वास व संरक्षण व हिताची ग्वाही देणारी होती. लोकहिताच्या तळमळीतूनच त्यांनी कारभार केला. त्यामुळे संरक्षण, लोकहिताबरोबरच त्यांचे आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे कार्यही सर्व प्रशासकांसाठी दिशादर्शक आहे.रयतेच्या कल्याणाची काळजी घेणारा जगातील आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव अग्रक्रमावर आहे. राज्यकारभार करताना विविध सोयी-सुविधा उभारण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. महाराज हे कुशल संघटक, लढवय्ये असण्याबरोबरच सर्वोत्तम व्यवस्थापकही होते. आज कोरोना साथीमुळे आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवरायांचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य जगभरातील शासक-प्रशासकांसाठी आदर्श ठरणारे आहे.रयतेप्रती संवेदनशीलतेचे दर्शन त्यांच्या कारभारातून होते. राज्यातील शेतकरी, गोरगरीब यांच्याबाबतची तळमळ त्यांच्या पत्रव्यवहार व वेळोवेळी जारी केलेल्या आदेशावरून दिसून येते. आपल्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘रयतेला काडीचाही त्रास देण्याची गरज नाही. रयतेच्या दाणे, भाकर, गवत, फाटे, भाजीपाला यांना हातदेखील लावायचा नाही’. त्यानंतर पावसाळ्यात उदभवणाऱ्या आपत्ती, निर्माण होणाऱ्या अडीअडचणी याबाबतीतही त्यांनी पूर्वतयारीचे सुस्पष्ट निर्देश दिले आहेत. ते अधिकारी वर्गाला पाठवलेल्या आपल्या पत्रात म्हणतात की, ‘पावसाळा जवळ आलेला आहे. चारा, धान्य काटकसरीने वापरा. तुमच्याकडचे धान्य, चारा संपला तर तुम्ही शेतकऱ्यांकडील दाणे, भाकरी, गवत, जळण, भाजीपाला आणाल. रयतेला असा कुठलाही त्रास होता कामा नये. उन्हाळा असला तर आगी लागण्याचे प्रमाण वाढते. त्यात लाकूडफाटा नष्ट होतो. त्यामुळे तसे न घडण्याची काळजी घ्यावी. प्रत्येकवेळी सर्वदूर फिरून लोकांशी संपर्क ठेवावा. शेतकरी बांधव, शेती व पशुधनाची काळजी घ्यावी.’
शेतकरी बांधवांना बैलजोडी व बी-बियाणे यासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. दुष्काळाची आपत्ती उदभवल्यास रयतेला धान्यपूरवठ्याची तजवीज करण्याचेही त्यांचे आदेश होत दुष्काळ निवारणासाठी त्यांनी पाणी साठवण योजना राबवली. साग, आंबा अशी झाडे तोडू नयेत. स्वच्छता करताना पालापाचोळा गडाखाली ढकलता कामा नये. तो एकत्र करून सुरक्षितपणे जाळावा व त्याठिकाणी भाजीपाला लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. परकीय हल्ला झाल्यावर त्याला तोंड देऊन जनतेचे संरक्षण कसे करावयाचे याची एक आदर्श कृतीपद्धती त्यांनी निश्चित करून दिली होती.
आग्र्याहून सुटका ही त्यांच्या धाडस व व्यवस्थापनाचे महत्वाचे उदाहरण आहे. प्रत्येकाला पूर्वतयारी, कृती, पार पाडावयाची जबाबदारी याची सुस्पष्ट जाणीव करून दिली जाई. कारभारातही रोजच्या कार्यक्रमाचा, निर्णयांचा तपशील ठेवला जाई. त्याचा नियमित आढावा घेऊन कामांना गती दिली जात असे.
त्यांचे संघटन, अचूक नियोजन, उत्तम प्रशासन व जनतेशी सुसंवाद यामुळे शिवकाळात वेळीच आपत्तीचे निवारण होऊन जनतेला दिलासा मिळे. प्रत्येक बाबतीतील सुस्पष्ट आदेश व त्यांच्या अंमलबजावणीतील सुसूत्रता यामुळे शिवकाळात कारभाराची घडी नीट बसून शेती व व्यापाराला चालना मिळाली. व्यापारी पेठा, बंदरे, आरमार यांचा विकास झाला. शिवरायांचे प्रशासकीय कौशल्य महान होते. नेतृत्व व प्रशासकीय यंत्रणा यात एकवाक्यता होती. जनहिताच्या व स्वराज्याच्या व्यापक ध्येयाशी स्वराज्यनिष्ठ यंत्रणा त्यांनी उभारली होती. प्रत्येकाला आपले काम,आपली जबाबदारी याची स्पष्ट जाणीव होती. अशी सक्षम व्यवस्था शिवकाळात निर्माण झाली आणि शिवरायांनंतरही दीर्घकाळ ती टिकून राहिली. छत्रपती शिवरायांचे विचार व कार्य आजही जगभरातील शासनकर्त्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.
- -हर्षवर्धन पवार,
- जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती