दि.३१ आँगस्ट,२०२१ ला शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथून समाजसेवक,लेखक ,कवी, आदर्श शिक्षक प्रा.पी.जी.भामोदे सर सेवानिवृत्त होत झालेत.त्यानिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बा. बुंदेले यांचा “आदर्श शिक्षक प्रा.पी.जी.भामोदे”
हा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत. -संपादक
========================
समाजसेवक, लेखक ,कवी , आदर्श शिक्षक प्रा. पी जी. भामोदे सर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये येणार्या शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालयात एकूण ३६ वर्षे सेवा करुन शासकीय तंत्र शिक्षण कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथून
दि.३१ आँगस्ट,२०२१ ला सेवानिवृत्त झालेत,त्यानिमित्त त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी हा लेखप्रपंच.
प्रा.पी.जी.भामोदे सरांनी ३६ वर्षात विद्यार्थ्यांसाठी राबविलेले शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारलेले सामाजिक कार्य लक्षात घेणे आवश्यक आहे. करजगाव बहिरम येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.पुढिल शिक्षण अमरावती व मुंबईला घेतल्यावर सन १९८५ ला शासकीय सेवेत तंत्र कनिष्ठ महाविद्यालयात क.म.वि. शिक्षक पदावर सेवा करण्यास सुरुवात केली .विद्यार्थ्यांना शीलवंत व गुणवंत बनविण्यासाठी परिश्रम घेऊन ध्येयवादी बनविले.
- “एकच ध्येय विद्यार्थ्यांनो
- विद्यार्थी जीवनात /
- दीर्घोद्योगाने बनावे तयांनी
- शीलवंत नि गुणवंत //”
असे विद्यार्थ्यांना घडविणार्या प्रा.भामोदे सरांनी किचकट आणि अवघड वाटणार्या तंत्र विषयांना सोपे करुन शिकविण्याचा मार्ग अाचरणात आणला. त्यावर उपाय म्हणून सोप्या तंत्र शैक्षणिक माँडेलची त्यांनी स्वत: निर्मिती केली. त्यांच्या या शैक्षणिक माँडेलला माननीय संचालक, व्यवसाय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांनी २००४ ला मान्यता दिली. त्यामुळे प्रा.भामोदे सरांनी बनविलेले तंत्र शैक्षणिक मँडेल सर्व महाराष्ट्रभर पोहोचले. या त्यांच्या तंत्र शैक्षणिक मँडेलला मराठी विज्ञान परिषद मुंबईचा “बेस्ट शैक्षणिक माँडेल अवार्ड” २००५ ला अनेक मान्यवर शास्रज्ञांच्या शुभहस्ते सन्मानाने मिळाला.
- कार्यात सातत्य/ असे एकाग्रता/
- वाढे गुणवत्ता /विद्यार्थ्यांची//
अशी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचे कार्य सरांनी स्वत:च्या कार्यकाळात सतत केले. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणारा “बेस्ट टिचर अवार्ड” २००६ ला तत्कालिन मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते बहाल करण्यात आला.पुरस्कार प्रसंगी सरांना शाँल,श्रीफळ,पुष्पगुच्छ ,रोख रक्कम आणि दोन वेतनवाढी देण्यात आल्या. सरांचे अनेकविद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत तर अनेक विद्यार्थी स्वयंरोजगार करीत आहेत. प्रा.भामोदे सरांना शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचे मागील २५ वर्षापासून सतत समाजप्रबोधनाचे कार्य सुरु आहे . त्यांनी थोर पुरुषांच्या जयंती -पुण्यतिथीनिमित्त समाजामध्ये विविध विषयावर अनेक व्याख्याने दिलेली आहेत. कवितेतून व लेखातून जनजागृती ते आजही करतात.
प्रा.भामोदे यांचे स्वलिखित ” मी जोतीराव फुले बालतो” ” जाणता विद्यार्थी” , “मी गुरू रविदास बोलतो” हे एकपात्री नाट्यप्रयोग आहेत ते त्यांनी नाट्यरुपात साहित्य संमेलन व शाळा-महाविद्यालयात स्वत: सादर केले व आजही सराचे हे एकपात्री नाटक सुरुच आहेत. माझ्या नांदगाव कनिष्ठ महाविद्यालय,नांदगाव खंडेश्वर येथे २०१७ ला ” मी जोतीराव फुले बोलतो.” हा एकपात्री प्रयोग नाट्यरुपात प्रा.भामोदे यांनी स्नेहसंमेलनानिमित्त सादर केला होता तेव्हा सर्व स्रोते मंत्रमुग्ध झाले होते.समाज विविध व्यसनातून मुक्तहोण्यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती जनजागृतीचे कार्यक्रम सादर केले असून भाषणातूनही जागृती केलेली आहे. आज अनेक प्रकारातील लेखन साहित्य उपलब्ध आहे पण प्रतिज्ञेचे पुस्तक उपलब्ध नव्हते म्हणून त्यांनी व त्यांच्या पत्नी डाँ.सौ निर्मला भामोदे यांनी थोर पुरुष आणि विविध विषयावरील प्रतिज्ञा लिहून त्या सर्व प्रतिज्ञेचे “प्रेरणादायी प्रतिज्ञा “पुस्तक तयार केले व हे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाद्वारे २०११ला प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक प्रत्येक शाळा-महाविद्यालयाच्या ग्रंथालयात संग्रही असावे, असेच आहे.तसेच तंत्र शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ” स्कूटर,मोटर,सायकल रिपेरिंग” हे पुस्तक प्रकाशित केले.
शैक्षणिक अाणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रा.पी.जी.भामोदे सर दि. ३१ आँगस्ट ,२०२१ ला सेवानिवृत्त होत आहेत. सरांना सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! आणि समाजसेवेसाठी , दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी निरामय आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही शुभकामना व्यक्त करतो.
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- अमरावती
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९