नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनावरील लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
कोरोनावरील लसीचा देशात आवश्यक साठा आहे. त्याची चिंता करण्याची गरज नाही, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. सरकारने मंजुरी दिलेल्या दोन्ही लसी प्रभावी आहेत, असे त्यांनी सांगितले. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता लस घेता येणार आहे. यासाठी पात्र नागरिकांनी लगेचच लसीकरणासाठी नोंदणी करावी आणि लस घ्यावी, असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर दुसर्या टप्प्यात ६0 वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजारी नागरिकांना लस देण्यात येत आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.
लसीकरणात पहिल्या डोसनंतर ४ ते ६ आठवड्यांत दुसरा डोस घेण्याच्या आधी सूचना होत्या. पण आता कोविशिल्ड लसीच्या बाबतीत ४ ते ८ आठवड्यांत दुसरा डोस घेता येईल, असे यासंदर्भात नेमलेल्या समितीने सुचवल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024