- *‘सेवा माह’ उपक्रमातून गरजूंना आवश्यक सेवा-सुविधा
- * गुरूदेवनगर येथील शिबिरात दिव्यांग बांधवांची तपासणी; त्यांना विनामूल्य उपकरणे मिळणार
अमरावती : केंद्रिय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व मोझरी येथील श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे विविध तालुक्यांतील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिरे ठिकठिकाणी घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आज गुरुदेवनगर मोझरी येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये झालेल्या शिबिरात 537 दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये दोन हजारहून अधिक दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला आहे.
दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त 28 जानेवारीपर्यंत संपूर्ण महिना ‘सेवा माह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार ‘एडिप’ योजनेत दिव्यांग बंधूभगिनींना पहिल्या टप्प्यात तपासणी व दुस-या टप्प्यात उपकरण व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात येणार असून, अनुदानाव्यतिरिक्त लाभार्थ्याने भरावयाचा हिस्सा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भरला जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कुठलाही खर्च लागणार नाही. दिल्ली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.
मोर्शी तालुक्यात पहिले शिबिर लेहगाव, भातकुली तालुक्यात सिकची रिसॉर्ट येथे, तर अमरावती तालुक्यासाठी क्षितिज मंगल कार्यालयात शिबिर झाले आहे. सुमारे दोन हजार दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला. शिबिरांत नोंदणीकृत, तसेच नोंदणी नसलेल्या दिव्यांगजनांनाही लाभ मिळवून देण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांच्या तपासणीनंतर त्यांच्या गरजेनुसार मोजमाप घेऊन आवश्यक ट्रायसिकल, कॅलिपर्स, फूट, श्रवणयंत्र, स्टिक आदी साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे.