मी मूर्तिजापूर येथील श्री. गाडगे महाराज महाविद्यालयात प्रा. मुकुंद खैरेसर समाजशास्त्राचे प्राध्यापक होते. मी जेमतेम अकरावी, बारावीला असणार तेंव्हा पासून सरांचा परिचय.
मूर्तिजापूर साठी सर नवीनच, आम्हा महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना हाताशी धरून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी युवा मंच स्थापना केली. आंबेडकरी विचारांच्या तरुणाची फळी निर्माण केली. त्यांना तालुक्यातील गाव खेड्यांचा परिचय नव्हता, तो वाढविण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम असो व इतर समाज प्रबोधनात्मक सर आवर्जून उपस्थित राहत होते.
सर मूर्तिजापूरला सुरवातीला छत्रपती सिरसाट यांच्या घरात भाड्याने राहत होते.
तेथून जवळच स्टेशन विभागात रेल्वे कॉलोनी मध्ये मी राहत होतो. जसा वेळ मिळेल तसे सर कॉलनीत अगत्याने यायचे. तास नि तास चर्चा करायचे. माझ्या घरी आठवड्यातून दोनतीनदा बैठक व्हायच्या. सरांनी खरे तर तेथूनच तरुणाची फळी निर्माण केली.
अन्यायाविरुद्ध चीड असलेला नेता उरला नाही, अशी खंत सरांना होती. म्हणून समाजासाठी विधायक कार्य आपण केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहचले पाहिजेत.
ह्या तळमळीतून पुढे त्यांनी मूर्तिजापूर शहरात शिक्षक, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमचं स्थापन केला . त्यामध्ये प्रा. डॉ. चिंतामण कांबळे, प्रा. व्ही आर कांबळे, प्रा. डॉ. गोपाल उपाध्ये , उल्हास भटकर, खांडेकर साहेब, बी जी इंगळे, जे पी वानखडे, म सु वानखडे, सरदार सर, इंगोलेसर, कुंभारेसर , आणि असे तमाम आंबेडकरी विचारसरणीचे लोक, तसेच सरांच्या खांद्याला खांदा लावून उभी असलेली तरूण फळीतील मॅचिंद्र भटकर, समाधान इंगळे, सुनील वानखडे,
कैलास इंगळे, सुनील गवई, उद्धव चक्रे, असे ज्ञात अज्ञात बरीचशी तरुण तडफदार पिढी सरांच्या सोबतीला होती, परिसरातील कोणत्याही गावात कार्यक्रम असला की , मिळेल त्या वाहनाने प्रसंगी सायकलने सुद्धा गाव गाठायचे.
सरांची समाजबद्धल तळमळ पाहून आम्हाला सुद्धा ऊर्जा यायची. बाबासाहेब आंबेडकर विचारमचंच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्याख्यानमालेचे तीन दिवसीय आयोजन डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात येत असे. त्यामध्ये महाराष्ट्रातील थोर आंबेडकरी चळवळीतील विचारवंत बोलवण्यात येत होते. बराच काळ गेल्यानंतर सर त्यामध्ये रमले नाही.
पुढे त्यांनी समाज क्रांती आघाडीची स्थापना केली. अन्यायाविरुद्ध चीड असणारा हा माणूस कसा स्वस्थ बसणार. त्यांना राज्यव्यापी आंदोलन उभं करायचं होतं. त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाची घटना घडली. मा. रामदास आठवले समाजकल्याण मंत्री झाले. सरांनी मूर्तिजापूरला त्यांचा भव्य सत्कार करण्याचा मनोदय आमच्या समोर व्यक्त केला. सरासोबत आमची टीम होतीच लगेच आम्ही मुंबई गाठली. मा. आठवले साहेबांच्या सरकारी बंगल्यावर . तब्बल आठ दिवस थांबून सुद्धा साहेबांची भेट होईना. सर आणि आम्ही सात आठ पोर. रात्री दोन तीन वाजता साहेब दौऱ्यावरून यायचे अन थेट बंगल्यात घुसायचे. त्यांचे सचिव भेट काही घेऊ देत नव्हते.
शेवटी सरांनी एक भन्नाट आयडिया काढली, आम्हाला म्हणाले, आपण रात्रभर इथंच मुक्काम करू, सकाळीच साहेब बाहेर निघाले की लगेच गाठायचं. तसच ठरलं.ठरल्याप्रमाणे सकाळी जसे साहेब आले तसेच सर जाहीर सत्काराच निवेदन घेऊन त्यांच्या समोर गेले ,आमचा गराडा अवतीभवती होताच. आठ दिवस झाले साहेब मुंबईत आहो.तुंमची भेटच होत नाहीये. आमच्यापैकी कुणीतरी बोललं. कोण आहेरे साहेब बोलले. सगळयांवर नजर फिरवित म्हणाले, कुठून आलात , सर म्हणाले अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातून , लगेच साहेब माघारी फिरले, त्यांचा अंगरक्षक मागोमाग गेला, लगेच परत आला आणि म्हणाला, साहेबानी सगळ्यांना आतमध्ये बोलावले.
आमच्या जिवातजीव आला. सरांची आणि आठवलेसाहेबांची चर्चा झाली . चहापाणी आदरातिथ्य झाले. जेवण करून जा असे सांगून निघून गेले.
आम्ही परत गावी आलो. सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
सरांचे राजकारणात विशेष अशी काही रुची नव्हती, समाजाचा उद्धार, शोषित पिढीत आदिवासी समाजाला न्याय हक्क मिळावे, याकरीता त्यांचा लढा होता. सुरवातीच्या काळात जवळपास आम्ही आठ दहा वर्षे त्यांच्या सोबत होतो. त्यांचे राष्ट्रीय, देशपातळीवर काम वाढत गेले.
अधेमधे सरांची भेट व्हायची, अहो भटकर कथा कविता लेख लिहून नाही होत प्रबोधन समाजच. ठोस कार्य करा. मी हसून टाळून देत होतो. तुम्हांला काम करावं लागेल बर, मी मान हलवून होकार देत निरोप घेत होतो. दोन तीन वर्षांपूर्वी सर आजारी होते तर भेटायला गेलो. छायाताई हसतच माझ्याकडे आल्या अन म्हणाल्या ” काय रे राजेन्द्रा तू तर आम्हांला विसरूनच गेला. भेट नाही की फोन नाही, बराच वेळ सरांसोबत गप्पा केल्या. वाचत असतो तुझ्या कविता , मी म्हणालो, आवडतात, लिहीत चल, आता सरांचा कथा कविता बद्धलचा दृष्टीकोन बदलला होता. सरांचा निरोप घेतला. छायाताई म्हणाल्या , असाच येत जा , बघ बर सरांची प्रकृती किती बिघडली, किती करतात रे समाजासाठी , पण….. अन नकळत मला 2010 ची विधानसभेची निवडणूक आठवली. जातीवादी मतदारसंघात एका उच्च विद्याविभूषित प्राध्यापक, वकील संघटन कौशल्य, हरहुन्नरी माणसाचा एका … पोरानं पराभव केला होता.
सोन ते सोनंच असतं . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी कसल्याही संकटाना भीक घालत नाही. सरांनी चळवळीसाठी स्वतःची मुलगी गमावली कार अपघातात. स्वतः मरणाच्या दारातून बाहेर पडले. कित्येकदा त्यांच्या वर प्राणघातक हल्ला झाला. तरीही ते डगमगले नाहीत. चळवळसी बांधील राहिले. जेवढा त्याग सरांचा आहे तेवढा सहभाग छायाताईचा आहे.
ताईमुळेच सर सामाजिक चळवळ राबवू लागले.
सरांच्या पावलावर पाऊल ठेऊन नुकतंच समाजाच दायित्व पत्करून चळवळीत काम करून सरांचा वारसा चालविण्यासाठी त्यांची मुलगी ऍड. शताब्दी सरसावली असतांना काळाने तीच्यावर घाला घालावा.ही फार मोठी समाजाची अपरिमित हानी झाली आहे. चळवळीत तन मन धनाने काम करणारे बाबासाहेबांचे खरे वारसदार असे पटापट निघून जात आहेत. ही मनाला सुन्न करणारे आहे.
सरांच्या कुटुंबासाठी माझे शब्द मुके झाले. तरीही त्यांच्या अश्या निमूटपणे जाण्यावर माझी शब्दरूपी आदरांजली…..
सांगा सर
कसे अश्रू ढालू
आज तुमच्या मरणावर
येऊही शकत नाही
श्रध्दासुमने अर्पन्या
आज तुमच्या सरणावर…
– राजेंद्र क.भटकर
बडनेरा