- करजगावच्या गुजरीवरून मला एक प्रसंग आठवला…
1973-74 सालची घटना असावी. त्यावेळी आमच्याकडे ‘धानाळे’नावाचे शेत होते. (आज ते शेत गीरधारी गोबरू- यांचेकडे आहे) बाबानी ते प्रभाकर चौधर्याकडून विकत घेतले होते. तसं ते शेत सुपीक पण सखल होते. वरचा भाग भरकाडीचा होता पण खालची फाटकाकडील जमीन फारच सुपीक होती. त्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकायचा म्हणून त्याचे नाव धानाळे’ होते. खरीप पिकानंतर त्यात आम्ही त्यात रब्बीचा हरभरा पण काढायचो. जवळपास 5वर्षे ते शेत आमच्याकडे होते. पण त्यातील 3वर्षे सारखा ओला दुष्काळ पडला होता. जास्त पाण्यामुळे शेत चिबडायचे. शेताच्या मधोमध पाण्याचा पाट वाहायचा. त्यात मी कित्तेक वेळा खेकडे मासोळ्या पकडल्या होत्या.
1973साली शेतात एखादा एकर धान, तेवढेच हायब्रिड आणी बाकी तुर पर्हाटी पेरली होती. तुरीच्या ओळीत मायने काकड्याचे बी टाकले होते. जवळपास 5एकर तूर पर्हाटी होती. पोळ्याच्या तेवढ्यात खुप काकड्या पण लागल्या होत्या. पोळ्याला काकडीचा मान असतो आणि अनायासे पोळा गुरूवारी असल्यामुळे आई बाबानी बुधवारी दुपारी च काकड्या तोडल्या होत्या. चांगल्या 55/60किलो असतील.
गुरूवारी सकाळी च बाबा ते गुजरीत घेऊन गेले. मायने कुठूनतरी पारडे आणले होते. बाबानी एक किलो दोन किलोचे दगडी गोटे बनवून दिले. मी गुजरीत काकड्याचा ढिग पोत्यावर टाकून बसलो होतो. 20 पैसे किलोने विकायचे सांगून बाबा घरी निघुन गेले. त्या दिवशी मी बेपारी झालो होतो. 10/12रूपये मिळतील या खुशीतच होतो. पण 7ः30 पर्यंत कोणिही काकड्या खरेदी केल्या नाही. फक्त कडू आहे कि गोड या नावाखाली 2/3किलो तरी काकड्या लोकांनी खाउन टाकल्या होत्या. विकत न घेता खायचे तेव्हा माझं मन फार दुखायचं.अर्ध्याएक तासानी किती विक्री झाली हे हे पाहायला बाबा आले. पण कोणीही खरेदी केली नाही असे मी त्यांना सांगितल्यावर ते थोडे नाराजीच्या सुरात हसले आणि 15 पैसे किलोने विकायचे सांगून घरी निघून गेले.
गुजरीत बेपारी मोठमोठ्याने कल्ला करित होते. त्यांच्या जवळील माल आणि भाव लोकांना माहीत व्हावा म्हणून ओरडत होते. मी पण काऽऽकडी 15पैसे किलो, काऽऽकडी 15पैसे किलो म्हणून मोठमोठ्याने ओरडू लागलो होतो. लोकांनी या घ्याव्यात म्हणून जीव तोडून ओरडत होतो. ओरडू ओरडू माझ्या घश्याला कोरड पडली होती.तरीही गिऱ्हाईक फिरतच नव्हते.बाबा पुन्हा पाहायला आले पण तोपर्यंत माझा माल कोणीच विकत घेतला नव्हता. फक्त 20/25लोकानी मात्र काकड्यांची चव जरूर चाखली होती.
शेवटी बाबा तेथेच असताना भांडेगावचा एक मुसलमान बेपारी तेथे आला आणि बाबाचे त्याच्यासोबत काय बोलणे झाले माहित नाही पण बाबाने सर्व काकड्या ठोकमध्ये त्याला 7ः00रूपयात विकल्या होत्या.मी रिकामे पोते पारडे, वजनाचे गोटे घेऊन घरी गेलो. मायने मला भातक्यासाठी10 पैसे दिले मी पुन्हा गुजरीत गेलो असता मुद्दामहून काकड्या पाहण्यासाठी गेलो असता त्याच्या जवळपास सर्वच काकड्या खपल्या होत्या त्या पण 25पैसे किलोप्रमाणे.
मी घरी गेल्यावर मायला ही गोष्ट सांगितली की आपला 15पैसे भाव असून सुध्दा कोणी काकड्या घेतल्या नाही आणि मुसलमानाकडून 25पैशाने खरेदी केल्या. आपल्याकडून घेतल्या असत्या तर आपल्याला 14/15रूपये मिळाले असते. यावर मायचं उत्तर होतं “बाबा बंजाऱ्यायले काही काकड्याचं महत्त्व नसते, अन् कुणबी- धानबी तोंड पाहून माल घेत असते. आपण पडलो खालच्या जातीचे, तेव्हा आपल्याकडून ते कसे विकत घेणार? ” मायचं उत्तर ऐकून तेव्हा मला फारच वाईट वाटलं होतं…!
- प्रा. रमेश वरघट