निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in संकेतस्थळ
अमरावती, दि. 23 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) वरीक्षा दिनांक 20 नोव्हेंबर, 2020 ते 05 डिसेंबर, 2020 या कालावधीत तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परिक्षा (इ. 12) दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार दि. 23 डिसेंबर, 2020 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यांनतर विहित नमून्यात विहित शुल्कासह गुरुवार, दि. 24 डिसेंबर, 2020 ते शनिवार दि. 2 जानेवारी, 2021 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमून्यात विहित शुल्कासह गुरुवार दि. 24 डिसेंबर, 2020 ते मंगळवार दि. 12 जानेवारी, 2021 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. दहावीसाठी verification.mh-ssc.ac.in, बारावीसाठी verification.mh-hsc.ac.in स्वत: किंवा शाळा, महाविद्यालयातून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहिल. तसेच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल. यासाठी 12 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करता येईल.
नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
सन 2021 मधील माध्यमिक प्रमाणपत्र (इयता. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयता. 12 वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारायची असल्याने त्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ठ होण्याची संधी सन 2020 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन देय संधी उपलब्द राहील, असे डॉ. अशोक भोसले, प्र. सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी कळविले आहे.