- * जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी मुलाखतीचा टप्पा व पालकांशी संवाद सत्र जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीत आज झाले. चाळणी परीक्षेत पात्र ठरलेल्या 463 उमेदवारांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेण्यात आल्या.
योजनेसाठी एकूण 6 हजार 405 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर बीजगणित, इंग्रजी आदी विषयांची प्राथमिक चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या 463 उमेदवाराचे जिल्हानिहाय मुलाखती घेण्यात आल्या. सहायक आयुक्त कौशल्य विकास प्रफुल्ल शेळके, सहाय्यक प्राध्यापक पंकज शिरभाते, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार, नव गुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेल्फेअरचे नितेश शर्मा हे उपस्थित होते.
‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ हा अत्यंत उपयुक्त कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यातून निश्चितपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी पालकांशीही संवाद साधला.
श्री. शेळके यांनी योजनेचे स्वरुप व वैशिष्ट्ये याबाबत माहिती उमेदवार व पालकांना प्रास्ताविकातून दिली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.