- हे क्रांतीभूमी..!
- धम्मचक्र प्रवर्तनदिन
- आम्ही दरवर्षीच
- साजरा करतोय,
- अशोक विजया दशमीला
- 14 आँक्टोबर 1956 दिनी
- आम्ही बौद्ध झालो
- तेव्हापासून आजतागायत
- तू आमच्यासाठी
- उजेडाचं झाड झालीस,
- विज्ञानवादी विचारांची
- सावली झालीस दीक्षाभूमी !
- तुझ्या कुशीत विसावतांना
- माणुसकीची महाऊर्जा मिळते
- जातांना प्रज्ञेची शिदोरी
- डोक्यात घेऊन जात असतो
- तुझी प्रेरणा डोक्यात आहे तोवर
- परिवर्तनशील
- मार्गानेच प्रवास करीत असू
- पुन्हा गत काळोखाच्या
- मार्गावर कधीच वळणार नाही …!
- आमचं टकुरं कुणी कितीही
- फिरविलं ,तरी आता ते फिरत नाही
- बुद्ध- भीमाचे परिवर्तनशील विचार सोडून
- आता आम्हाला दुसरं काहीच कळत नाही !
- आता तुच आमची प्रेरणा
- तुच जगण्याची ऊर्जा
- तुच आमची युद्धाशाळा
- आणि तुच आमची क्रांतीज्वाळा,
- धम्मचक्र प्रवर्तन हेच
- आम्हास मिळालेलं महादान आहे !
- अरुण विघ्ने
—–