दोस्तांनो, तुमच्यापैकी अनेकांना जंगल सफारीची आवड असेल. त्यासाठी थंडीचा सिझन बेस्ट ठरतो. आपल्याकडे जंगल सफारीसाठी काही उत्तम ठिकाणं आहेत. त्यात मध्य प्रदेशमधल्या पेंच राष्ट्रीय अभयारण्याचा समावेश होतो. या राज्यातल्या सिवनी आणि छिंदवाडा या दोन जिल्ह्याच्या मध्यभागी पेंच हे अभयारण्य वसलं आहे. छिंदवाडापासून ७५ किलोमीटर अंतरावर असणार्या पेंचमध्ये वाघ पहायला मिळतात. वाघांसह विविध प्रजातींचे प्राणी बघण्यासाठी पेंचला भेट द्यायला हवी. या परिसरात वाहणार्या पेंच नदीवरून अभयारण्याला पेंच हे नाव देण्यात आलं. अत्यंत सुंदर दर्या आणि पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या अभयारण्यात फिरण्याचा मनमुराद आनंद तुम्ही लुटू शकता. मुख्यत्वे पेंच अभयारण्यात दुर्मीळ प्रजातींचे प्राणी आणि पक्षी पहायला मिळतील. हे अभयारण्य ७५७ चौरस किलोमीटर परिसरात पसरलं आहे. इथे वाघांसह शिकारी कुत्रे, बिबटे, हरणं, विविध प्रजातींची माकडं, कोल्हे, चितळ, नीलगाय, तरस असे प्राणी मुक्तपणे विहार करताना पहायला मिळतात. यासोबतच २१0 प्रजातींचे पक्षी इथली खासियत आहेत. अनेक स्थलांतरित पक्षीही इथं येतात. जानेवारीनंतर इथली थंडीही कमी होते.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023