एकेकाळी विदर्भ म्हणजे काँग्रेस पक्षाचा गड याच नजरेतून दिल्लीकर विदर्भाकडे पाहत होते. यातूनच विदर्भात काँग्रेसच्या उमेदवारीवर थेट जम्मू काश्मीरचे नेते गुलाब नबी आझाद यांना यवतमाळ लोकसभेची उमेदवारी मिळते. ते निवडून आले नाही, ही बाब वेगळी. यासह रामटेक लोकसभा क्षेतातून नरसिंग राव निवडून येतात. इतके सर्व वैदर्भीय जनतेने काँग्रेस पक्षाला दिले. विदर्भाची राजकीय जमीन अजूनही काँग्रेसला पोषक राहिली असती. मात्र, हाडाचे कास्तकार असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पुर्वार्शमीचे जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत भाऊसाहेब फुंडकर व माजी आमदार अरुण अडसड यांनी काँग्रेसला अनुकूल असलेली विदर्भाची जमीन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर नांगरूण, वखरून कमळ फुलविण्यासाठी मशागत करून घेतली. या शेतीवर आता १0 पैकी तब्बल भाजपाचे ५ खासदार लोकसभेवर जातात. यासह विधानसभा तसेच विधान परिषदेवर मोठय़ा संख्येने आमदार निवडून जात आहे. विदर्भातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा पडकत आहे.
गावखेड्यातील हजारो ग्रामपंचायतींवर भाजप समर्थीत सरपंच आहेत. याचे बर्याचअंशी श्रेय पश्चिम विदर्भातील गावखेड्यात पकड असलेले भाजपाचे नेते माजी आमदार अरुण अडसड यांना जाते, असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरू नये. भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावान नेते म्हणून अरुण अडसड यांची ओळख आहे. १९७८ मध्ये चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते सातत्याने निवडणूक लढवीत आहेत. १९९0 आणि १९९९ मध्ये त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदारांनी त्यांना मिळवून दिली. १९९५ मध्ये युतीची सत्ता असताना पराभव होऊनही अडसड यांना विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्षपद दिल्याने त्यांची राजकीय उंची संपूर्ण वैदर्भीय जनतेने पाहिली.
अडसड यांच्यातील संघटन कौशल्याची दखल भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून घेतली गेली. पण, मधल्या काळात त्यांची कोंडी झाली होती. विदर्भातीलच काही ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांचा दुरावा वाढत असल्याच्या राजकीय वावटळ्या उठत होत्या. अरुण अडसड यांनी भाजपच्या किसान सेलचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांच्या राजकीय कारर्कीदीला धामणगाव रेल्वे नगर परिषदेत जनसंघाच्या नगरसेवकपदापासून सुरुवात झाली. १९८५ ते १९९0 पर्यंत ते धामणगावचे नगराध्यक्ष होते. १९९0 ते १९९५ या कालावधीत ते चांदूर रेल्वे मतदारसंघाचे आमदार होते. विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते, भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे मेमोरियल ट्रस्ट, नागपूरच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला पहिला विदर्भ भूषण पुरस्काराने भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुण अडसड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आल्याने त्यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
- प्रमोद बायस्कर